केडगाव येथील त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- केडगाव येथे बनावट प्रमाणपत्राच्या आधारे हॉस्पिटल चालवून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर व सदर हॉस्पिटल चालकांना पाठिशी घालणार्‍या तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे स्मरणपत्र सामाजिक कार्यकर्ते संदिप भांबरकर यांनी पोलीस अधिक्षक व महापालिका आयुक्तांना दिले.

केडगाव या ठिकाणी रेणुकामाता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून, सदर हॉस्पिटल बनावट प्रमाणपत्राच्या आधारे चालत असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पुराव्यानिशी निवेदन देऊन देखील कारवाई करण्यात आली नसल्याने स्मरणपत्र देऊन पुन्हा संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. मनपा हद्दीत योग्य पदवीधारक वैद्यकीय व्यवसायिक यांनाच हॉस्पिटल चालविण्याचा अधिकार आहे.

असे असतानाही केडगाव या ठिकाणी रेणुकामाता मल्टीस्टेट हॉस्पिटल हे डॉ. प्रीती राजेंद्र हंगे यांच्या नावाने चालू आहे. परंतु डॉ. प्रीती हंगे यांनी स्वतः रुग्णांची देखभाल न करता संदीप वाळुंज हाच त्या ठिकाणी हॉस्पिटलचे कामकाज पाहत होते.

तसेच या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता सदर हॉस्पिटलचा नोंदणी दाखल्यावर आरोग्य अधिकारी यांची सही नाही. तर सदरचा दाखला डॉ.प्रिती हंगे, संदीप वाळूंज व मनपा आरोग्य विभागातील औटी यांनी केवळ स्वतःच्या खाजगी फायद्यासाठी तयार केला असून त्यास तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची मुक सहमती होती.

असे असतानाही सदर व्यक्तीने संबंधित हॉस्पिटलच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयातून रेमडेसिविर याची मोठ्या प्रमाणात मागणी करून ते संबंधित हॉस्पिटलच्या नावाने उपलब्ध करून घेतले. हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटर सुद्धा चालविले व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण मृत्यू पावले.

मध्यंतरी महापालिका आरोग्य अधिकारी बोरगे व आरोग्य कर्मचारी औटी यांच्याजवळ बेकायदेशीरपणे रेमडेसिविर इंजेक्शन सापडले होते. ते याच हॉस्पिटलच्या नावाने महापालिकेत जिल्हाधिकार्‍यांमार्फत उपलब्ध झाले होते. त्यासंबंधि पोलिस चौकशी सुरू आहे.

संबंधित घटनेची संपूर्ण माहिती आरोग्य अधिकार्‍यांना असल्यामुळे ते पोलिस चौकशीला जात नसल्याचे स्मरणपत्रात म्हंटले आहे.

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे हॉस्पिटल चालवून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केला व कोरोना रुग्णांचा जीव गेल्याप्रकरणी डॉ. प्रीती हंगे, संदीप वाळूंज व मनपा कर्मचारी औटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, याबाबत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यांच्यावरही ही कारवाई करण्याची मागणी भांबरकर यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe