अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- करोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील श्रावणी सोमवार यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे श्रावण महिन्यात भाविकांनी भीमाशंकरकडे येऊ नये, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याही वर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे.

भाविक अगर पर्यटक याकडे दुर्लक्ष करून मंदिराकडे येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर शासनाचा आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून डिंभा व पालखेवाडी येथे पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून,
प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दर वर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकरला मोठ्या संख्येने भाविक येतात. श्रावणातील दर सोमवारी यात्रा भरते.
याचे नियोजन प्रशासन व भीमाशंकर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येते. यंदा नऊ ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान यात्रेचे आयोजन केले होते.
मात्र, करोनाचे सावट कायम असल्याने भीमाशंकर व परिसरातील पर्यटनस्थळांवर संचारबंदी लागू आहे. राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे यावर्षी श्रावणी सोमवार यात्रा होणार नसल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भीमाशंकरच्या दर्शनापासून वंचित वंचित राहावे लागणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम