अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शिवसेना, जिल्हा अग्रणी बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना देण्यात आले. राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. तसेच लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचनाही प्रसारित केल्या आहेत.
राज्य शासनाच्या 13 एप्रिलच्या ब्रेक द चेन या आदेशान्वये सर्व शासकीय कार्यालय, सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन ते सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडित असल्याने या मधील कर्मचार्यांचा शासकीय कर्मचार्यांप्रमाणे जनतेशी संपर्क असतो. सध्या सर्व बँक व पतसंस्थेचे कर्मचारी फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून सेवा देत आहे.
अनेक बँक कर्मचारींना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा यामध्ये जीव देखील गेला आहे. तरी देखील सर्व कर्मचारीची सेवा अविरत सुरु असून, त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांचे लसीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बँकेत अपुरे कर्मचारी असल्याने बँकेवर ताण वाढला आहे. लसीकरणासाठी रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणात वेळ जात असल्याने काम सोडून कर्मचार्यांना लसीकरणासाठी जाता येत नाही.
नागरिकांची आर्थिक अडचण निर्माण होऊ नये व बँक सुरळीत सर्व कर्मचार्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|