अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोनाच्या भितीने माणुस माणसापासून दुरावत असताना, फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बलघटकांना आधार दिला.
तर नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून तब्बल 1270 दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. द्या अंधांना दृष्टी, पाहतील तेही सृष्टी या उक्तीनुसार नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील एका छोट्याश्या गावातून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ही नेत्रदान चळवळ उदयास आली.
जलसंपदा विभागात कार्य करीत असताना जालिंदर बोरुडे या अवलियाने नेत्रदान चळवळीत उत्तुंग शिखरा एवढे कार्य उभे केले. तर गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे कार्य सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातून महिन्याला पाच वेळा जिल्ह्यातील विविध ठिकाणी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेतले जात आहे.
कोरोना सारख्या महामारीत देखील दृष्टीदोष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाचे नियम पाळून शिबीर घेण्यात आले. अद्याप सुमारे 1 लाख 93 हजार रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानाने मरणोत्तर नेत्रदानातून 1270 दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळाली आहे. त्यामुळे अनेकांना हे सुंदर जग पाहता आले.
अशाच प्रकारचे काम विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून केले जाते. परंतू जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदान चळवळीत केलेले कार्य वाखाणण्याजोगेच आहे. त्यांच्या कार्याला जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त दिलेला हा उजाळा….! ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेत, सामाजिक बांधिलकीतून 1991 मध्ये फिनिक्स फाऊंडेशनची स्थापना बोरुडे व त्यांच्या सहकार्यांनी केली.
सुरुवातीला असं काही ठरलेल नव्हत की, नेत्रदान चळवळती कार्य करायचे मात्र, शहरातील विडी कामगार, बांधकाम कामगार, हमाल, कष्टकरी, शेतकरी, मजूर, महिला, गरीब वंचितघटकांसाठी काहीतरी केले पाहिजे. यासाठी त्यांनी नेत्रदान चळवळ हाती घेतली.
गेल्या 28 वर्षांपासून नेत्रदान चळवळ, उपक्रम सुरु आहे. तसेच रक्तदान शिबीर महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने समाजात विविध क्षेत्रात कार्य करणार्या कर्तृत्वान महिला पुरुषांना जीवन गौरव पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
जालिंदर बोरुडे हे जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. समाजसेवेची आवड असल्याने व त्यांच्या नेत्रदान चळवळीमुळे ते कार्यालयातील सहकार्यांचे आणि हजारो रुग्णांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेतले.
कोरोनाच्या संकट काळात देखील गरजूंसाठी घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. कोरोनाने सर्वसामान्यांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला होता. मोठ-मोठे हॉस्पिटल सेवा देत असताना आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जाणे देखील शक्य नव्हते.
अशा परिस्थितीमध्ये फिनिक्स फाऊंडेशनचे शिबीर सर्वसामान्यांसाठी आधार ठरले. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने या उपक्रमाचा लाभ घेतला. कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या शिबीरांची राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती (दिल्ली) व केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दखल घेऊन बोरुडे यांचा गौरव केला.
प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला नागरदेवळे येथे शिबीर होत असून, त्याचा फायदा अनेक गरजू रुग्ण घेत आहे. तसेच या चळवळीच्या माध्यमातून 78 हजार नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. या सामाजिक कामासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचे पाठबळ मिळत आहे.
बोरुडे यांच्या नेत्रदान चळवळीने गती घेतली असून, त्यांनी लावलेला रोप बहरला आहे. नेत्रदान चळवळीवर आधारीत त्यांनी समाजाला प्रेरक असे दृष्टीमित्र व नेत्रज्योत नावाची दोन पुस्तके लिहीली आहे. या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या शिबीरासाठी नागरदेवळ्याचे गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, राजू बोरुडे, वैभव दाणवे, आकाश धाडगे, बाबासाहेब धिवर आदि फिनिक्स फाऊंडेशनच्या सदस्यांचे सहकार्य लाभत असते. जिल्ह्यातील नव्हे तर सोलापूर, नंदुरबार, धुळे, वैजापूर आदि ठिकाणांचे गरजू रुग्ण शिबीराचा लाभ घेत असून, नेत्रदान चळवळीचा भाग बनत आहे.
बोरुडे यांचे फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान या ब्रीद वाक्याने सुरु असलेली नेत्रदान चळवळ अशीच पुढे सुरु राहो. त्यांच्या या कार्यात समाजातील प्रत्येकाने हातभार लावण्याची खरी गरज असून, नेत्रदान करण्यासाठी व करुन घेण्यासाठी पुढाकार घेतल्यास बदल घडून अनेक दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम