अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी कोठी येथील मार्केटयार्डचे फळ, भाजीपाला व फुल विभाग सोयीचे असून सदर विभाग सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण आहे.
नेप्ती उपबाजार समिती येथे कोरोना काळानंतर भरविण्यात आलेले सदरचे बाजार गैरसोयीचे व असुरक्षित असल्याने तेथील फळ, भाजीपाला व फुल विभाग बंद करावा. तर कोठी येथील मार्केटयार्ड मध्येच हे बाजार भरविण्यासाठी पार्किंग व इतर सोयी निर्माण करुन योग्य नियोजन करण्याची मागणी सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, आडत व नागरिकांमधून होत आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन महिन्यापासून बंद असलेले शहराच्या कोठी भागातील मार्केटयार्डचे फळ, भाजीपाला व फुल विभाग सुरळीतपणे नियमांचे पालन करुन सुरु झाले आहे. टाळेबंदीत हा बाजार नेप्ती उपबाजार समिती मध्ये भरविण्यात आला होता.
मात्र सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, आडत व नागरिकांचे यामुळे चांगलेच हाल झाले. नेप्ती उपबाजार समिती बायपास रोडवर असून, या रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने चालत असल्याने काही शेतकरी व हमाल बांधवांचे अपघात झाले.
यामध्ये काहींचा जीव गेला तर काही गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले. नुकतेच नेप्ती उपबाजार समिती जवळ अपघात होऊन एकाचा जीव गेला आहे. येथे भाजीपाला मार्केट सुरू करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असुरक्षित आहे.
तर शहरातील मध्य ठिकाणी असलेला मार्केट विभाग सोडून एका बाजूला नेप्ती येथे असलेला बाजार शेतकर्यांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. यामुळे शेतकरी, किरकोळ व्यापारी यांचा वाहतुकीचा खर्च वाढत आहे. परिणामी ग्राहकांना देखील भाजीपाला महाग मिळत आहे.
नेप्ती उपबाजार समितीमध्ये फळ, भाजीपाला व फुलांचा बाजार गैरसोयीचा असून, कोठी येथील मार्केटयार्ड मध्येच हा विभाग योग्य नियोजन करुन चालविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मुख्य बाजार समितीमध्ये अनधिकृत बांधकामे काढून पार्किंगची सुविधा पुरविल्यास होणारी वाहनांची गर्दी व वाहतुक कोंडी टळणार आहे.
शहरातील मार्केट हे शेतकरी व ग्राहक हिताचे व सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे असल्याची भावना सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, आडत व नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम