शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांची होळी

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटकच्या वतीने शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात मार्केटयार्ड चौकात कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकरी विरोधी कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे बहिरनाथ वाकळे, सतीश पवार, फिरोज शेख, दिपक शिरसाठ सहभागी झाले होते.

कोरोना नियमनांचे पाळन करुन हे आंदोलन करण्यात आले. गेल्यावर्षी दि. 5 जून 2020 रोजी रोजी केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते.

या अध्यादेशाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेसहित सर्व शेतकरी समर्थक संघटना व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी राष्ट्रव्यापी आंदोलन सुरु केले त्याला एक वर्ष पुर्ण होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करा, कृषी निविष्ठा, बि-बियाणे, औषधे यांना जी.एस.टी मुक्त करा, शेतमालाला हमी भावासाठी कायदा करा, कोरोना लस सर्वांना मोफत द्या, डिझेल पेट्रोल वरील अबकारी कर कमी करून त्याचे भाव कमी करा,

कांदा, बटाटा व इतर कृषी मालाला किमान हमी भाव जाहीर करा या मागण्यांसाठी कृषी कायद्यांच्या प्रती जाळून इशारा दिवस पाळण्यात आला.

6 जून 2018 रोजी मध्यप्रदेशातील मंदसौर येथे हमीभावासाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर भाजप सरकारने गोळीबार केला होता व त्यात सहा शेतकरी शहीद झाले होते. त्यानंतरच देशव्यापी शेतकरी आंदोलन उभे राहिले.

त्या शेतकरी शहिदांना आदरांजली म्हणून रविवारी (6 जुन) रोजी संकल्प दिवस पाळला जाणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.