आठ दिवसात फेज २ पाणी योजनेचे पाणी न मिळाल्यास नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनात आंदोलन…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नागापूर, बोल्हेगाव परिसरात फेज २ पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून, पाणी सोडण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे.

तरी येत्या आठ दिवसात फेज २ पाणी योजनेचे पाणी न मिळाल्यास नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, नगरसेवक अशोक बडे यांनी दिला आहे.

यासंदर्भात नगरसेवक श्री.सप्रे, श्री.बडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका रिता भाकरे, सौ.कमल सप्रे, निलेश भाकरे, बबनराव कातोरे यांच्यासह नागरिकांनी मंगळवारी (दि.८) महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन चर्चा केली.

यावेळी आयुक्त गोरे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. तुम्हाला पाणी सोडायला काय अडचण आहे? नागरिकांना खोटे शब्द देऊ नका. पाणी सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करा, असे आयुक्तांनी सुनावले.

यावेळी आयुक्त गोरे यांना निवेदन देऊन पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. सदर निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.७ मधील नागापूर, बोल्हेगाव परिसरामध्ये फेज २ पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून, पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे टेस्टिंगसुद्धा झालेले आहे.

पाण्याच्या टाकीचे साफसफाईचे कामही झालेले आहे. माताजीनगर या भागातील नागरिकांनी मनपाकडे पैसे भरून नळकनेक्शन घेऊन २ महिने झाले तरीही त्या नागरिकांना टाकीतून पिण्याचे पाणी मिळत नाही.

त्यामुळे माताजीनगर या भागात पूर्ण दाबाने वेळेवर पाणी देण्याचे आदेश संबंधित विभागास द्यावेत. तसेच प्रभागातील सर्व परिसरामध्ये फेज २ पाणी योजनेचे पाणी वाटप टाकीमधून चालू करण्याचे आदेश लवकरात लवकर द्यावेत.

तसेच माताजीनगर या भागातील नागरिकांना येत्या ८ दिवसात फेज २ पाणी योजनेचे पाणी नाही मिळाले तर नागरिकांसमवेत शिवसेना स्टाईलने आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News