अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचाही वेग वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत युद्धपातळीवर सुरु आहे.
यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत ६ हजार ७१६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना १ एप्रिलपासून लसीकरणाची सुरुवात होणार आहे.
७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३३ आरोग्य उपकेंद्रे लसीकरणासाठी सज्ज करण्यात येत आहेत. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होती. १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
तालुक्यातील ३३ आरोग्य उपकेंद्रांमध्ये आठवड्यातील तीन दिवस लसीकरण केले जाणार. नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. एका लसीकरण केंद्रावर पाच कर्मचारी आवश्यक आहेत.
तालुक्यामध्ये आरोग्य विभागामध्ये सुमारे ४५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची मोठी अडचण आरोग्य विभागासमोर आहे. त्यातच कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे त्यासंबंधी उपाययोजना करण्याचीही जबाबदारी आरोग्य विभागावर आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|