भारतातील सर्वांत उंच पूल आणि मोठा बोगदा महाराष्ट्रात ! पुणे-मुंबई अंतर आणखी अर्ध्या तासाने कमी होणार…

Ahmednagarlive24
Published:

यशवंतराव चव्हाण (मुंबई-पुणे) द्रुतगती महामार्गाच्या क्षमतावाढ प्रकल्पाचे (मिसिंग लिंक) काम अंतिम टप्प्यात आले आहे. १३.३ किलोमीटर लांबीचा बोगदा वर्षभरात खुला होणार आहे. अर्ध्या तासाने कमी होणार आहे. खोपोली-कुसगाव येथे उभारण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’चे काम अंतिम टप्प्यात आले असून, बोगदा येत्या २०२५ (मे-जून) पासून पूर्णतः वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (पुणे) कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी सांगितले आहे.

मिसिंग लिंक अभ्यास पाहणी दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे, उपअभियंता अभिजीत मुदगल, प्रकल्प सल्लागार टीम लिडर सतीश शर्मा, डेप्युटी टीम लिडर मधुकेश्वर गावकर, रेसिडेंट इंजिनीअर विश्वास चिंचोरे, टनेल काँट्रॅक्टर नवयुगा इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेडचे महेश रेड्डी उपस्थित होते.

पुणे ते मुंबईदरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. यादरम्यान, प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र नेहमीच वाहतूक कोंडीचा फटका बसत असतो. त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होतात. वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी,

यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे ते मुंबई हे अंतर कमी व्हावे, यासाठी मिसिंग लिंक प्रोजेक्टचे काम सन २०१९ साली हाती घेतले होते. या प्रकल्पांतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दुहेरी बोगदा तयार करण्यात आला आहे.

मिसिंग लिंकच्या एका बोगद्याची लांबी ८.९३ किलोमीटर एवढी आहे. तसेच एका बोगद्याची लांबी १.६७ किलोमीटर एवढी आहे. या बोगद्यांचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, आता फक्त बोगद्याच्या अंतर्गत भागातील यंत्रणेची कामे जलदगतीने सुरू आहेत. तसेच या बोगद्यांची जोडणी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला देण्यासाठी खोपोलीच्या दिशेने दोन पुलांची उभारणी केली जात आहे.

यातील १.८ किलोमीटर लांबीचा पूल पूर्ण झाला आहे, तर ९५० मीटर लांबीच्या केबल स्टेड प्रकारातील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे ७० ते ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या मे-जून २०२५ अखेरपर्यंत राहिलेले काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

■ एकूण ६६०० कोटी रुपयांचा खर्च
■ एकूण १३.३ किलोमीटर लांबीचा बोगदा आणि पूल
■ जमिनीपासून १०९ मीटर सर्वांत उंच पुलाची निर्मिती (खांब) ■ केबल स्टेड पुलाचे काम अंतिम टप्प्यात.

सर्वांत उंच पूल आणि जास्त रुंदीचा बोगदा
राज्य शासनाचा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील १३.३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९३ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टिकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मिसिंग लिंकवर १८० मीटर (अंदाजे २२ ते २५ मजली खांब) उंचीचा सर्वांत उंच पूल आणि सर्वांत जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात आला आहे. दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकचे (लेन) बोगदे तयार होत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe