अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यात लॉकडाऊन सुरू असल्याने व वाईन्स शॉप बंद असल्याने तळीरामांना इंग्लिश दारू मिळणे आता मुश्किल झाल्याने राहुरी तालुक्यात देशी दारूची विक्री जोरात सुरू आहे.
तसेच पाण्याच्या बाटलीत भरून गावोगावी बनावट गावठी दारू (सरमाडी) विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेष म्हणजे समाजात वावरणारे पांढरपेशी बगळेदेखील यात शिकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राहुरी तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात देशी, विदेशी दारुसह गावठी (सरमाडी) दारूची विक्री सुरूच आहे. सुरुवातीला काही दिवस किंमतीपेक्षा दुप्पट दराने देशी व विदेशी दारू उपलब्ध होत होती.
राहुरी तालुक्याच्या आजूबाजूच्या काही ठराविक ठिकाणावरून ही दारू मिळत होती. तसेच लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी काही विनापरवाना असलेल्या हॉटेलचालकांनी लाखो रुपयांचा माल खरेदी करून ठेवला होता.
बंदच्या काळात या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात कोटींची उलाढाल झाली. राहुरी तालुक्यात मुळा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये तसेच देवळाली प्रवरा,
वांबोरीसारख्या काही ठिकाणी केमिकलयुक्त पावडर पासून बनावट गावठी (सरमाडी) दारूची निर्मिती व विक्री केली जात असल्याचे समजते.
एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही बनावट दारूची वाहतूक करण्यासाठी दूधाच्या किटलीचा तसेच ड्रमचा वापर केला जातो. गावोगावी दुधाची किटली, ड्रम पोहोच झाल्यावर गावातील एखादे मोठे झाड, वस्ती,
रस्त्याच्या कडेला असणारे शेत आदी ठिकाणी लपवून तेथून पाण्याच्या रिकाम्या बाटलीत ही बनावट गावठी दारूची विक्री केली जात आहे. या एका बाटलीची एरव्ही विस रुपये असणारी किंमत आता शंभर रुपये झाली आहे.
तर पन्नास रुपयाला मिळणारी देशी दारू दोनशे रुपयाला विकली जात आहे. नेहमी देशी, विदेशी दारू पिणारे,
समाजात उच्चभ्रू म्हणून मिरवणारे पांढरपेशी बगळेदेखील आता दारूच मिळत नसल्याने ही केमिकल युक्त पावडरपासून तयार करण्यात आलेली गावठी दारू पिणे पसंत करत आहेत.
ही दारू आरोग्यास हानिकारक असल्याने राहुरी तालुक्यात पांगरमलसारखी घटना घडू नये, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|