अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- सध्याच्या ऑनलाईनच्या काळात अँड्रॅाईड मोबाईल असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात आहे.त्यामुळे सहाजिकच हे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
त्यामुळे या मोबाईलसाठी लागणारा डाटा म्हणजेच इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची देखील संख्या मोठी आहे. परंतु ग्रामीण भागात आजही या कंपन्यांकडून अखंडीत सेवा दिली जात नसल्याचे वास्तव आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.
नगर तालुक्यात चिचोंडी पाटील परिसरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या जिओ मोबाईल कंपनीच्या टॉवरद्वारे नागरिकांना रेंज कनेक्टिव्हिटी सेवा पुरवण्यात येते.
परंतु गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सातत्याने जिओ कंपनीद्वारे मोबाईल रेंज विस्कळीतपणे पुरवली जाते मोबाईल कंपनी आपल्या विविध मासिक, त्रिमासिक प्लॅनप्रमाणे ग्राहकांकडून संपूर्ण रक्कम घेते परंतु या काळामध्ये अनेकवेळा मोबाइल कंपनीच्या टावरद्वारे देण्यात येणारी रेंज कनेक्टिविटी नसते.
कधी कधी तर दोन तासापासून दहा ते बारा तासापर्यंत ही कनेक्टिव्हिटी नसते, मग या काळात ग्राहकांकडून प्रीपेड मोबाईल प्लॅनद्वारे वसूल केलेल्या पैशाच्या बदल्यात सेवा पुरवली जात नाही. ही बाब निश्चितच टेलिकम्युनिकेशन सेवा नियमन कायद्याअंतर्गत येणाऱ्या अटी व शर्तीचे उल्लंघन ठरत आहे.
या मोबाईल कंपनीच्या विरोधातील ग्राहकांच्या तक्रारी स्थानिक व जिल्हा पातळीवर फारशा गांभीर्याने घेत नाहीत. सद्यस्थितीला कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा, क्लासेस बंद आहे शाळा-कॉलेज मार्फत ऑनलाईन शिक्षण प्रणाली अवलंबली आहे.
जिओ मोबाईल कंपनीच्या टॉवर कनेक्टिव्हिटी नसल्याकारणाने अनेक विद्यार्थ्यांना हे ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते, ही बाब गंभीर तर आहेच परंतु ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणारी ठरत आहे. यामुळे चिचोंडी पाटील परिसरातील नागरिकांमध्ये जिओ कंपनीच्या विरोधात रोष निर्माण होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम