अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील लोकांसाठी दोन दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणणारे खासदार डॉ. सुजय विखे या इंजेक्शनचा खात्रीशीर उपयोग होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यासाठी धावाधाव करून नये, असा सल्लाही दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, खासदार विखे हे डॉक्टर आहेत, त्यांना जर माहिती होते, या इंजेक्शनचा खात्रीशीर उपयोग होत नाही, तरीही त्यांनी 10 हजार इंजेक्शन का व कुणासाठी आणले? असा आवाज आता जनतेतून येत आहे.
खा.डॉ. विखे यांनी आज रविवारी पारनेर तालुक्यात विविध कोविड केअर सेंटरला भेटी देत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रेमडेसिवीरबद्दलचे आपले वादळी मत व्यक्त केले.
खा. डॉ. विखे म्हणाले, ‘ज्या रेमडेसिवीरसाठी लोक धावाधाव करीत आहेत, ते करोनावरील रामबाण उपाय नाही. रुग्णांचे नातेवाईक जेवढी धावपळ करतील तेवढा त्याचा काळाबाजार केला जाईल, आर्थिक लुटमार होईल.
डॉक्टर या नात्याने जबाबदारीने सांगतो की, आमच्या विळद घाट येथील हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शनचे वेगवेगळे अनुभव नोंदले गेले आहेत. २२ ते ३० वयोगटातील अनेक रुग्णांना या इंजेक्शनचे सहा डोस देऊनही त्यांचा मृत्यू झाला आहे.
याउलट एकही इंजेक्शन न देता साठ वर्षांवरील अनेक रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे करोनावर नेमकी उपचार पद्धती नाही, नेमके कोणते औषध काम करते, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही.
त्यामुळे लोकांनी मनातील चिंता काढून टाकावी. रेमडेसिवीर मिळाले नाही म्हणून आपला रुग्ण दगावेल ही भीती मनातून काढून टाकावी.
गंभीर रुग्णांना खरी गरज आहे ती ऑक्सिजनची. आपल्या जिल्ह्यात आता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत आहे. ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर केल्या जातील,’ असे डॉ. विखे यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|