ना.थोरात म्हणाले : अधिक लस पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करू

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- जिल्ह्यात अद्यापही दैनंदिनरित्या साधारणता तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना कराव्यात तसेच लसीकरण मोहीम अधिक गतीने राबविण्याची गरज असून,

याबाबत राज्य पातळीवर पाठपुरावा करुन जिल्ह्यासाठी लशीचा अधिक पुरवठा होईल, याबाबत लक्ष घालू असे ना.बाळासाहेब थोरात म्हणाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ना.थोरात यांनी कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.

यावेळी ते बोलत होते, संभाव्य लाट रोखण्यासाठी जे जे आवश्यक उपाय आहेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. त्याचबरोबर ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत, तेथील कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्याठिकाणी तात्काळ केल्या जाणे आवश्यक आहे.

सध्या दुसऱ्या लाटेतही काही तालुक्यात अद्यापही रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी सर्वेक्षण करुन बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडण्याची आवश्यकता आहे.

याचबरोबर, जिल्ह्यात सध्या लसीकरणाचा वेग काहीसा कमी आहे. केंद्र सरकारकडून लशीचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी प्राप्त झालेल्या लसींचे योग्य नियोजन करुन त्याचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला जाईल, याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.