अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- निळवंडे धरणाच्या कालव्याला महाविकास आघाडी सरकारने गती दिलेली असून यासाठी राज्य सरकार एक रुपयाही कमी पडु देणार नाही. निळवंडेच्या पाण्यामुळे जिरायत भाग समृद्ध होईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे मंत्री पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी कालव्याच्या स्लॅब व मातीच्या भरावाच्या कामांची पहाणी करुन आढावा घेतला. यावेळी ना. पाटील बोलत होते.

ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात यावर्षी ५०० कोटी रुपयांची तरतुद या कालव्यासाठी केलेली आहे. या कालव्यांचे काम डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण करण्याचे उद्दीष्ठ आहे.
या कामामुळे कालव्यात पाणी येऊन या जिरायत भागातील शेती समृद्ध होऊन येथील परीसर सुजलाम सुफलाम होणार असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी कणगर येथील भागडा चारीच्या देखभाल दुरुस्तीसाठी येथील लाभधारक शेतकरी सुयोग नालकर, अनिल घाडगे, सोन्याबापु उऱ्हे, दादासाहेब पवार, किशोर गागरे यांनी १ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी नामदार पाटील यांच्याकडे केली.
यावर नामदार पाटील यांनी प्रस्तावाबाबत औरंगाबाद येथील गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क साधून प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याची सूचना दिली असल्याचे सांगितले. प्रस्ताव प्राप्त होताच निधी मंजुर करू, असे यावेळी आश्वासित केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम