अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- अतिक्रमण काढल्याचा राग धरत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांचे दालन व बांधकाम विभागातील संगणक, टेबल व काचांची तोडफोड केली. याप्रकरणी सुनील भाऊसाहेब गोर्डे ( वय ४०, रा. अस्तगाव ता. राहाता ) यांच्या फिर्यादीवरून सनी रमेश वाघ,
योगेश तुळीदास बागुल, कैलास द्वारकानाथ जाधव, बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, नीलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निकुंब (रा. कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे हे आपल्या पथकास कोपरगाव शहरातील अतिक्रम केलेल्या टपऱ्या हटविण्याची कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान सनी वाघ, बालाजी गोर्डे,
साई गोर्डे, नीलेश गोर्डे यांनी गोर्डे यांना दमदाटी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी कार्यालयात येऊन बांधकाम अभियंता डिंगबर वाघ यांच्या टेबलवरील काचा फोडल्या, संगणक जमिनीवर फेकला,
खुर्ची जमिनीवर फेकली. उपमुख्याधिकारी गोर्डे यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर गोर्डे यांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम