Panjabrao Dakh Havaman Andaj : दोन-तीन दिवसांपूर्वी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला होता. यामध्ये पंजाबरावांनी महाराष्ट्रात 22 जून पासून पावसाचा जोर वाढणार असे म्हटले होते. विशेष म्हणजे पंजाबरावांचा हा अंदाज आता खरा ठरला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी अगदी अवकाळी पावसासारखा वादळी पाऊस बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल राज्यातील नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अगदी अवकाळी पावसासारखा पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारे अन पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिकांची दाणाफान उडाली होती.
खरे तर महाराष्ट्रात 12 जून पासून पावसाची उघडीप होती. सर्वत्र पाऊस गायब झालेला नव्हता, काही ठिकाणी पाऊस सुरु होता मात्र पावसाचा जोर हा कमी होता. मात्र आता तब्बल दहा दिवसांच्या कालावधीनंतर राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे.
पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे 22 जून पासून राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता किती दिवस पाऊस सुरू राहणार? यासंदर्भात पंजाब रावांनी काय म्हटले आहे याविषयी आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणतात पंजाबराव डख ?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून पासून ते 30 जून पर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच आज पासून सात दिवस पावसाचे राहणार आहेत. या कालावधीत महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.
तथापि ज्या शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या पूर्ण झालेल्या नसतील त्यांनी जमिनीत किमान एक ईतभर ओल गेल्यानंतरचं पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन देखील यावेळी जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे. राज्यातील जवळपास 60% शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत मात्र अजूनही 40% शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी असतील त्यांच्याकडेही पेरणी योग्य पाऊस होणार अशी आशा आहे.