अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा खाजगी मालकीच्या जागेतून होत असून, पोलीस आणि महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा
आरोप करुन वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले.
सदर वाळू उपसा बंद न झाल्यास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थाना समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यापेक्षा इतर तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात अवैध वाळू उपसा होतो. तरी देखील कारवाई करण्यात येते. मात्र राजरोसपणे पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे.
खाजगी जागेतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत आहे. तरी देखील अल्प प्रमाणात कारवाई केली जाते. मांडओहोळ, मुळा व काळू नदी पात्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरु असून टाळेबंदीतही दररोज वाळू वाहतूक सुरु आहे.
टाकळीढोकेश्वर येथे अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून सुद्धा पोलीस प्रशासनाच्या समोरून वाहतूक केली जात आहे. अर्थपुर्ण संबंधामुळे पोलीस आणि महसूल प्रशासन अवैध वाळू व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तालुक्यात वाळू तस्कर हैदोस घालत आहे.
यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, वाळू वाहतूकीमुळे अनेक रस्ते खराब झालेले आहे. पारनेर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या शासकीय व काही खाजगी जागेतून वाळू उपसा सर्रास सुरु आहे.
सदर ठिकाणचे पंचनामे करुन कारवाई झाल्यास अवैध वाळू उपसा करणार्यांची नांवे समोर येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम