अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत आहे. ही रुग्णसंख्या तातडीने नियंत्रणात आणणे गरजेचे असून
त्यादृष्टीने कोरोना संसर्ग साखळी तोडणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी कडकपणे करणे याला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर,
मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी,
मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन या महत्वाच्या बाबी आहे.
अगदी गावपातळीवरील अधिकारी-कर्मचारी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या गंभीरपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, विशेषता सार्वजनिक समारंभ, लग्न सोहळे आदी ठिकाणी नियमांची पायमल्ली होणार नाही,
याची दक्षता सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. नागरिकांनीही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केले तर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास अडचणी येतील याची दखल सर्वांनी घेतली पाहिजे.
ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रातील ही गर्दी रोखावी.
राज्य शासनाने दिलेल्या सवलती व्यतिरिक्तच्या वेळेत आस्थापना सुरु असल्याचे दिसल्यास कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एखाद्या ठिकाणी गर्दी झाली तर तात्काळ तेथील यंत्रणांनी त्याची माहिती मिळताच कारवाई करणे अपेक्षित आहे.
कारण ही गर्दी कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचे निमित्त ठरु नये, असे त्यांनी स्पष्ट केले. रुग्ण आढळून आलेल्या भागात भेटी देऊन तेथील रुग्णवाढीची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित करण्यात यावा जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही. कोरोना सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व रुग्णालयांना आवश्यक ऑक्सीजनची साठवणूक करण्यासंदर्भाव यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. दुसऱ्या लाटेत सर्वोच्च मागणी ज्या दिवशी नोंदविली गेली,
त्याच्या तीनपट ऑक्सीजन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपलब्धथ राहील, याचे नियोजन सर्व रुग्णालयांनी करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम