मनपा च्या  ‘त्या’नोटीसीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने निषेध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :-  प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, हा मुलभूत अधिकारच मान्य न करण्याची मनपाची भूमिका तालिबानी असून या प्रवृत्तीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख व जिल्हा निमंत्रक मन्सूर शेख यांनी निषेध व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर येथे करोनासंबंधीच्या उपाययोजनांची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये लसीकरणासंबंधी सुरू असलेल्या गोंधळासंबंधीचे प्रश्नही होते.

मनपाच्या लसीकरण केद्रांवर गोंधळ असून काही ठिकाणी कर्मचारी लस बाहेर विकत असल्यासंबंधी सामनाचे वार्ताहर मिलिंद देखने यांनी प्रश्न विचारला होता. त्याला पालकमंत्री मुश्रीफ यांनी याची दखल घेतल्याचे सांगून प्रशासनाला गैरप्रकार होत असतील तर चौकशी करण्याच्या सूचना तेथेच दिल्या होत्या.

असे प्रश्न पुन्हा पुन्हा येत असल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देशमुख व शेख यांनी म्हटले आहे की, -प्रश्न विचारल्याने त्रागा करण्यापेक्षा मनपाने आपला कारभार सुधारून कोठे लसीचा काळाबाजार झाला त्याची चौकशी करणे आवश्यक होते..

मात्र असे न करता पत्रकारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची मनपाची भूमिका आक्षेपार्ह आणि माध्यमांचा आवाज बंद करणारी आहे..

मनपाच्या अशा नोटिशीला आणि अरेरावीला आम्ही भीक घालणार नसल्याचे मत देशमुख व शेख यांनी व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून नोटिस मागे घेण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अन्यथा राज्यातील पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही देशमुख व शेख यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe