file photo

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून सुरु करण्‍यात आलेल्‍या स्‍वतंत्र प्‍लेसमेंट विभागाच्‍या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या थेट मुलाखातींमध्‍ये शेवटच्‍या वर्षातील १५० हून अधिक विद्यार्थ्‍यांना नामांकित .

बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्‍या संधी मिळाल्‍या आहेत. संस्‍थेच्‍या वतीने चेअरमन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वतंत्र प्‍लेसमेंट विभाग कार्यरत आहे. दरवर्षीच विद्यार्थ्‍यांसाठी नामांकित कंपन्‍यांना बोलावून थेट मुलाखतींच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध करुन दिल्‍या जातात.

अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मुलाखतीं घेण्‍यात आल्‍या होत्‍या. यामध्‍ये विविध विभागाच्‍या शेवटच्‍या वर्षातील विद्यार्थ्‍यांनी उत्‍फूर्तपणे मुलाखती दिल्‍या होत्‍या. यामध्‍ये १५० हून अधिक विद्यार्थ्‍यांना या नामांकित कंपन्‍यांनी नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध करुन दिल्‍या असल्‍याचे प्राचार्य डॉ.गुल्‍हाने यांनी सांगितले.

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आता ‘गुणवत्ता’ हाच एकमेव निकष राहणार असल्याने प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारीक ज्ञान आणि अनुभवाची जोड देण्‍यासाठी प्‍लेसमेंट विभागाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना मुलाखतींना आत्‍मविश्‍वासाने सामोरे जाण्‍यासाठी मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमातून नोकरीक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याच्या प्रयत्नामुळे अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध होण्‍यात मोठी मदत मिळत असून, या वर्षी प्रवरा रुरल इंजिनीरिंग कॉलेजचा संगणक विभागाचा विद्यार्थी गोपाल पांडुरंग वाघ यांची मिडास क्रिएटिंग इंटरप्रीमियर फ्लोरिडा, पुणे या ठिकाणी 12.6 लाखाची स्कॉलरशिप प्राप्त होऊन महाराष्ट्रातून प्रथम निवड झाली.

मिडास संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन ऑफलाइन अशा विविध प्रकारच्या चाचण्यांमध्ये त्याला प्रथम क्रमांक मिळाला. ही पदवी प्राप्त झाल्यानंतर स्वतःची आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली. त्यामुळे ग्रामीण भागातील गोपाल पांडुरंग वाघ याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण प्राप्त झाले आहे व त्याचे मार्गदर्शन इतर विद्यार्थांना मिळत आहे.

ग्रामीण भागात प्रवरेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी तयार होतात व प्रवरेचे नाव उज्ज्वल करतात प्रवरेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मागे नाही याचा अभिमान वाटतो असे मत आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

या विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, प्राचार्य.डॉ.संजय गुल्हाने, ट्रेनिंग प्लेसमेंटचे समन्वयक प्रा.मनोज परजणे, डॉ.आण्णासाहेब वराडे, डॉ.सचिन कोरडे सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.