अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करणेबाबत पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे घातले आहेत.
श्री. पवार यांनी शाळा सुरु करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, हिवरे बाजार या आदर्श गावात लोकांचा सहभाग व सामाजिक शिस्त असल्यामुळे राज्यातील पहिले कोरोनामुक्त गाव झालेले असून,
त्याच अनुभवातून विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी,पालक,शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर १५ जून २०२१ पासून इ. ५ ते ७ वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इ. ८ ते १० यशवंत माध्यमिक विद्यालय सुरु केलेले आहे.
त्यामुळे विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत. गेली ८ दिवस कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही. हिवरे बाजार हे गाव १५ मे २०२१ रोजी कोरोनामुक्त झाले, त्यात कोरोना सुरक्षा मुख्य समितीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक काम करत होते त्यामुळे विद्यार्थी व पालक यांचेशी शिक्षकांचा संवाद चालूच होता.
त्यातूनच १६ ते ३० मे या कालावधीत प्रत्यक्षात शाळा सुरु करणेबाबत विद्यार्थी व पालक सर्वे करून प्रत्यक्षात चर्चा केली आणि त्यांचे मत जाणून घेतले.
ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्या अनुषंगिक इतर सोयीसुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलांचे व पर्यायाने त्या कुटुंबाचा भविष्यकाळच अंधकारमय होण्याची भीती आहे.
आपल्याला कोरोना बरोबरच लढायचे आहे हे लक्षात आल्यामुळे प्रथमत: शिक्षकांची तदनंतर पालकांची व ग्रामपंचायत कोरोना सुरक्षा समितीची बैठक घेऊन हिवरे बाजार येथील विद्यार्थी, पालक,
शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी कोरोनाविषयक जबाबदारी स्वीकारली आणि शिक्षकांनी अध्यापनाचे काम करण्याची जबाबदारी स्वीकारून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम