लाल कांद्याचा तुटवडा; दर ६० रुपयांवर

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-देशात कांदा निर्यातबंदी उठविली असली, तरीही निर्यात अपेक्षेएवढी होत नसल्याने निर्यातबंदी उठवल्याचा कोणताही परिणाम कांदा दरावर झालेला नाही.

किरकोळ बाजारात आजही ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. प्रतवारीला हलका असलेल्या लाल कांद्याची विक्री किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो दराने केली जात आहे.

हळवी कांद्याचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात या कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांदा महाग झाला असून, किरकोळ बाजारात त्याचे दर गगनाला पोहोचले आहेत.

पुणे, नाशिक, वाशी या महत्त्वाच्या बाजार आवारात पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच नाशिक परिसरातून हळवी कांद्याची आवक होते. हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, गरवी (उन्हाळी कांदा) कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे.

मात्र, ही आवक अल्प प्रमाणात असल्याने गेल्या आठवडाभरापासून बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे.

सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ३०० ते ३४० रुपये, असा दर मिळाला आहे. गेल्या वर्षी गरवी कांद्याचे उत्पादन उच्चांकी झाले होते. मात्र, यंदा अवेळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले.

कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दररोज दीडशे ते दोनशे गाड्यांमधून कांदा विक्रीस पाठवला जात होता.