Share Market:- शेअर बाजार किंवा शेअर मार्केटचा विचार केला तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये असते की झटपट श्रीमंत होण्याचा हा एक मार्ग आहे. परंतु शेअर मार्केटचा विचार केला तर हे खूप गुंतागुंतीचे क्षेत्र असून यामध्ये खूप अभ्यास असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. सध्या अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात.
परंतु अशा पद्धतीची गुंतवणूक करताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. शेअर मार्केट म्हटले म्हणजे यामध्ये एका रात्रीत किंवा कमीत कमी कालावधीत पैसे गुंतवून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा यामध्ये दीर्घ कालावधी साठी केलेली गुंतवणूक चांगला पैसा मिळवून देऊ शकते. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्याबद्दल महत्वाची माहिती घेऊ.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना या गोष्टी टाळा
1- नव्या गुंतवणूकदाराने ट्रेडिंग करणे ठरू शकतो धोका– शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा एक ट्रेंड आपल्याला आता सध्या बघायला मिळतो तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजेच दररोज ट्रेडिंग करून ताबडतोब श्रीमंत व्हायची इच्छा असते. या इच्छामुळे बरेच जण कुठलाही शेअर खरेदी करतात आणि तो विकतात व त्यातून नफा कमवा असे साधारणपणे हे धोरण असते.
परंतु शेअर मार्केटचा विचार केला तर यामध्ये दीर्घ कालावधीसाठी आणि कमीत कमी कालावधीसाठी गुंतवणूक करून जबाबदारी पूर्वक तुम्हाला नफा कमवून देण्याची गॅरंटी कोणत्याही निकषाच्या आधारे देता येत नाही. कारण डेली ट्रेडिंग म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंग करून दररोज चांगला पैसा मिळेल असे घडून येत नाही. जर तुम्हाला शेअर मार्केटचा खूप दिवसांचा किंवा वर्षांचा अनुभव असेल तर तुम्ही एखाद्या दिवशी ट्रेडिंग मध्ये हात घातला किंवा ट्रेडिंग केली तर काही फरक पडत नाही.
2- टिप्स देणाऱ्यांपासून सावध राहावे– सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण पाहतो की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक किंवा शेअर खरेदी करण्याच्या बाबतीत अनेक जण टीप देत असतात. आपल्याला सांगण्यात येते की आम्ही इतके टक्क्यांचा परतावा देण्याच्या टीप तुम्हाला देतो व त्याकरिता तुमच्याकडून महिन्याचे इतके पैसे घेतो. परंतु असे होणे शक्य नाही.
दोन ते चार महिन्यापर्यंत हे सगळे चालू शकते परंतु त्यानंतर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षात घेता येईल अशी गोष्ट म्हणजे जर कुठला शेअर उच्चांकी पातळी गाटेल हे जर कोणाला माहिती राहिले असते तर दुसऱ्याला कोणीच सांगितले नसते. त्यामुळे अशा टीप देणारे लोक काहीतरी माहिती विकतात व त्या माध्यमातून पैसा कमवून ते त्यांचा व्यवसाय चालवतात. पुढे अशा व्यक्तींपासून दूर राहून स्वतःचे नुकसान राहणे गरजेचे आहे.
3- युट्युबवरील शेअर एक्सपर्ट कडून सावधान– आता आपण युट्युब वर देखील अनेक शेअर मार्केटच्या टिप्स देणारे तथाकथित तज्ञ पाहतो. असे व्यक्ती अनेक प्रकारचे पटकन श्रीमंत होण्याचे मार्ग सांगत असतात व या नादामध्ये आपण अडकतो. तो अशा गोष्टींपासून नेहमी सावध राहणे गरजेचे आहे.
4- कर्ज काढून शेअर बाजारात पैसे लावणे चुकीचे– सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्ज काढून शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणे खूप जोखमीचे आहे. कर्ज काढून पैसे टाकले आणि हे पैसे वाढतील याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते. पूर्ण माहिती शिवाय जर तुम्ही यामध्ये पैसे गुंतवले तर नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
नंतर पैसे जाण्याचा संभव असतो आणि घेतलेले पैसे हे व्याजासहित परत करणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे माणूस कर्जाच्या चक्रात अडकतो. त्यामुळे ऐकून कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा काळजीपूर्वक यामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. शेअर बाजारा मागे खूप मोठे विज्ञान असून ते तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे.
5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेअर मार्केट पटकन श्रीमंत होण्याचा मार्ग नाही– सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या मनात असेल की शेअर बाजाराच्या माध्यमातून तुम्ही ताबडतोब श्रीमंत होऊ शकतात. तर हे खुळ अगोदर मनातून आणि डोक्यातून काढून टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घ कालावधीसाठी करणे गरजेचे आहे. कारण ज्या लोकांनी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली असेच लोकांनी यामध्ये पैसे कमावल्याचे या माध्यमातून दिसून येते.