अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- श्रीगोंद्याचे तहसीलदार बेजबाबदारपणे वागत आहेत. सामान्यांची कामे करण्यात त्यांना रस नाही.
तहसीलदारांच्या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेले २ कोटी १८ लाख ८१हजार रुपयांचे अनुदान परत गेले.त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले.
तहसीलदारांच्या या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करत श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जुलै ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत अतिवृष्टी,पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ३ कोटी ९९ लाख ३३ हजार रुपयांची मागणी सरकारकडे केली होती.
सरकारने या मागणीचा विचार करून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून आलेल्या मदतीपैकी फक्त १ कोटी ८० लाख ५१ हजार १९२ रुपये अनुदान वाटप करण्यात आले. ३१ डिसेंबर २०२० व १७ फेब्रुवारी २०२१ रोजी २ कोटी १८ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम पुन्हा शासनाकडे जमा करण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान वाटप न होता पुन्हा शासनाकडे का जमा झाले, याबाबत तहसीलदारांना समाधानकारक खुलासा देता येत नाही. तहसीलदारांच्या बेफिकिरीमुळेच ही रक्कम शेतकऱ्यांना न मिळता पुन्हा शासनाकडे जमा झाल्याचा आरोप शेलार यांनी केला.
श्रीगोंद्याच्या तहसीलदारांच्या कामाची पद्धत चुकीची असून सर्वसामान्य लोकांशी ते उद्धटपणे वागतात. काम करत असताना तहसीलदारांनी वाळूचे ट्रक सोडले जातात.
पण सामान्य शेतकऱ्यांच्या माती, मुरूमाचे ट्रॅकटरवर मात्र तहसीलदार कारवाई करतात, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|