अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- कोरोनामुळे गेली अनेक महिने शाळा – कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झालेला दिसून आला त्याचबरोबरीने शिक्षण क्षेत्रावर देखील याचा मोठा परिणाम जाणवला आहे.
ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या परीक्षांची वेळ आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथमसत्राची परीक्षा 15 मार्चपासून ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ही परीक्षा ऑनलाईन होणार असली तरी ती विद्यार्थ्यांच्या मोबाईल, लॅपटॉपवर की महाविद्यालय स्तरावर होणार याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
असे असणार परीक्षांचे नियोजन :- द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होतील तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 30 मार्चपासून होणार आहेत.पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्ष सोडून इतर सर्व वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पध्दतीने होणार आहेत. ही परीक्षा 50 गुणांची व एका तासाची होणार आहे.
अंतिम वर्ष महत्वाचे असल्याने या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा 70 गुणांची आणि दीड तासाची होणार आहे. यात 50 गुणांचे एमसीक्यू प्रश्न असतील यासाठी एक तासाचा वेळ असेल तर 20 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी अर्धा तास वेळ असेल.
लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाचपैकी चार प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 30 शब्दांच्या आत असणे आवश्यक आहे. या प्रश्नांचे उत्तर एका कागदावर लिहुन त्याचे ते स्कॅन करावे लागणार आहे. त्यानंतर त्याचा क्युआर कोड जनरेट करून तो उत्तरपत्रिकेला जोडावा लागणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved