मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची किंमत पोहोचली २२ हजार कोटींवर !

Published on -

Manmad Indore Railway Project : आतापर्यंत कागदावर असलेला बहुप्रतिक्षित इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग जमिनीवर आणण्याच्या दिशेने काम वेगाने सुरू झाले आहे. या रेल्वे मार्गाचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून मध्य रेल्वेनेही रेल्वे बोर्डात तो अहवाल मांडला आहे.

या अहवालानुसार १० हजार कोटींच्या या प्रकल्पाची किंमत आता २२ हजार कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती इंदूरचे खा. शंकर ललवाणी यांनी दिल्याचे इंदूर-मनमाड रेल्वे मार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी सांगीतले.

इंदूर-मनमाड रेल्वे मार्ग एकूण २६८ कि.मी. लांबीचा असणार आहे. या रेल्वेमार्गामुळे धुळे ते नोएडा हे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे. धुळे- मनमाडदरम्यान ५० कि.मी.चे काम सुरू आहे. उर्वरित २१८ कि.मी. साठी २२०० हेक्टर जमीन लागणार आहे. या मार्गावर ३०० छोटे-मोठे पूल बांधण्यात येणार आहेत.

२० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे ९ बोगदे बांधले जातील. या मार्गावर ३४ स्थानके बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा फायदा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील इंदूर, धार, खरगोन, बारवानी, धुळे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांना होणार आहे.

खा. ललवाणी म्हणाले की, इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाबाबत आता ठोस प्रगती झाली आहे. इंदूर आणि मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल जिल्ह्यांच्या प्रगतीला देखील मोठा हातभार लागेल.

इंदूर ते मुंबई आणि दक्षिणेकडील राज्यांमधील संपर्क सुलभ होईल. आठवडाभरापुर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंदूर स्टेशनला भेट दिली होती. यावेळी खा. ललवाणी यांची या रेल्वेप्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली.

लालवाणी यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिल लाहोटी यांची भेट घेऊन इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. त्यावर सभापतींनी मध्य रेल्वेला लवकरच अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

आता या अहवालाची तपासणी करून रेल्वे बोर्ड हे नीती आयोगाकडे अहवाल पाठवेल. त्यानंतर नीती आयोग त्याचा अभ्यास करेल. हा अहवाल अर्थ मंत्रालयाकडे जाणार आहे. शेवटी केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करेल, असेही खा. ललवाणी म्हणाल्याचे मनोज मराठे यांनी सांगीतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe