अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे भेट देणार आहेत.
यावेळी ते पीडितेचे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कोपर्डी येथील घटनेनंतर एकवटलेल्या मराठा समाजाने राज्यभर मोर्चे काढले. आता पुन्हा एकदा याच गावातून आंदोलन सुरू होत आहे. आपल्या समाजाच्या भावी पिढीसाठी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी व्हावे.
असे आवाहन संजीव भोर यांनी केले आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील घटनेपासून मराठा आंदोलन सुरू झाले, मात्र येथील निर्भयावरील अत्याचाराचा खटला उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. आरोपीना अद्याप फाशी मिळालेली नाही. या नव्याने होणाऱ्या आंदोलनात त्याचा ही समावेश केला जावा.
अशी मागणी कोपर्डीकरांच्या वतीने केली जाणारआहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे जुलै २०१६ मध्ये एका शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चांचे स्वरूप पुढे बदलत जाऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला होता.
मधल्या काळात कोपर्डीतील मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाची सुनावणी नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा ही झाली. मात्र, त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, तेथे हा खटला दीर्घकाळ प्रलंबित आहे. घटना घडल्यापासून पेटलेल्या आंदोलनांतून हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालविण्याची मागणी होत होती. तत्कालीन सरकारने वेळोवेळी तसे आश्वासन ही दिले होते.
मात्र, सत्र न्यायालयातील टप्पा पार केल्यानंतर या खटल्याची सुनावणी रखडत गेली असून, या आरोपीना त्वरित फाशी दिली जावी अशी मागणी केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम