अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कारखान्यात सर्व मिळून सुमारे बाराशे कामगार आहेत. त्यांच्यासाठी कारखान्याने संगमनेरमधील एका खासगी हॉस्पिटलच्या मदतीने लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी कामगारांना एक ते दीड हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
यामुळे कामगारांचे लसीकरण होणार असले तरी कारखान्याने ही लस मोफत द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कारखान्याने मात्र, कामगारांच्या सोयीसाठी ही योजना आखल्याचे म्हटले आहे. संगमनेर कारखान्याने एक परिपत्रक काढून कामगारांना याची माहिती दिली आहे.
लसीसाठी लागणारे शुल्क कामागारांच्या पगारातून वसूल करून त्या हॉस्पिटलला देण्याची जबाबदारी कारखान्याने घेतली आहे. त्यासाठी जीएसएटी आणि सर्व शुल्क मिळून किंमत जाहीर करण्यात आली आहे.
कोविशिल्ड एक हजार रुपये, कोव्हॅक्सिन बाराशे रुपये तर स्फुटनिक दीड हजार रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे. कायमस्वरूपी कामगारांच्या पगारातून हे पैसे कपात केले जाणार आहेत, तर अन्य कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे रोख भरावे लागणार आहेत, असे परिपत्रकात म्हटले आहे.
यावरून मात्र आता वाद सुरू झाला आहे. कारखान्याने आपल्याच कारखान्याच्या कामगारांना मोफत लस देणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याचे पैसे आकारले जाऊ नयेत, असा सूर कामगारांमधून व्यक्त होत आहे. सरकारी केंद्रावर ही लस मोफत मिळत आहे.
कारखान्याने अशाच केंद्रामार्फत शिबीर घेऊन ती कामगारांना देणे अपेक्षित होते. ती मिळणार नसेल तर खासगी लस खरेदी करून आपल्या कामगारांना दिली जावी, अशीही अपेक्षात व्यक्त होत आहे. परिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून तालुक्यात यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम