राज्याने ‘या’ क्षेत्रात रचला नवा इतिहास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- महानिर्मितीने मंगळवारी दुपारी ४.४० वाजता १० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. मार्च महिन्यात राज्य सरकारच्या महानिर्मिती कंपनीची कामगिरी अधिकाधिक उंचावत आहे. ५ मार्च रोजी राज्यातील ९औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांनी किमान ९० टक्के वा त्याहून अधिक प्लांट लोड फॅक्टर प्राप्त करून विक्रम रचला.

यापूर्वीचा २० मे २०१९ रोजीचा १०,०९८ मेगावॅटचा उच्चांक मोडताना महानिर्मितीने आधी १० हजार २७५ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य केली व त्यात सातत्य राखत आता दु ४.४० वाजता आजचा स्वतःचाच विक्रम मोडून १० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती ची ऐतिहासिक कामगिरी केली आहे यामध्ये औष्णिक वीजनिर्मितीद्वारे ७९९१ मेगावॅट , वायू वीजनिर्मिती केंद्राद्वारे २६४ मेगावॅट तर जल विद्युत केंद्राद्वारे २ हजार १३८ मेगावॅट आणि सौर ऊर्जा प्रकल्पामधून ५० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

यावेळी महावितरणची वीजेची मागणी २२ हजार १२९ मेगावॅट होती तसेच राज्याची एकूण वीजनिर्मिती १६ हजार ४२९ मेगावॅट एवढी होती. महानिर्मितीने आज राज्याच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक वीजनिर्मितीचा विक्रम रचला याचा मला खूप आनंद होत आहे. हा इतिहास रचणाऱ्या महानिर्मितीतील सर्व अधिकारी, तंत्रज्ञ यांचे विशेष अभिनंदन करतो, अशा शब्दात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आनंद व्यक्त केला.

वीजनिर्मितीसाठी प्रभावी इंधन व्यवस्थापन, इंधनाचा आवश्यक तो साठा करणे, वीजनिर्मिती संचात बिघाड झाल्यावर लगेच दुरुस्ती करणे आणि संचात बिघाड होण्याची वेळच येणार नाही अशा पद्धतीने ऑपरेशन आणि मेंटेनन्स करणे यावर आम्ही सातत्याने भर देत आहोत.

याशिवाय वीज उत्पादन खर्च कमी करण्याचेही प्रयत्न करीत आहोत. त्याचे सुखद परिणाम आता दिसू लागले आहेत, असेही डॉ. राऊत म्हणाले. १०,००० पेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. दि ८ मार्च रोजीही महानिर्मिती ने १० हजार ९७ मेगावॅट निर्मिती साध्य केली होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe