समुद्रात जाणारे पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळवणे गरजेचे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  पाणी असेल, तरच गावे समृद्ध होणार आहेत. हे लक्षात घेऊन आगामी काळात पाण्याचे संकट टाळण्यासाठी नवीन पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे आहे.

त्यासाठी समुद्राकडे जाणारे पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यातील तुटीच्या क्षेत्रात वळवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.

राहुरीच्या प्रेरणा पतसंस्थेच्या आंबी येथील स्थलांतरीत शाखेचा उद्घाटन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. तनपुरे म्हणाले, पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात दिल्याने मुळा व भंडारदरा धरणाच्या क्षेत्रासाठी ५ टीएमसीपेक्षा अधिक पाणी उपलब्ध होणार आहे.

सध्या राज्यातील आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास असल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा केला जात आहे.

नेतृत्व चांगले असेल, तर गावचा विकास होण्यास मदत होते. १९८० च्या काळात नगर एमआयडीसी व इतर ठिकाणी मुळा धरणातून पाणी नेले गेले. त्यावेळी लक्ष घातल्याने राहुरी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच मुळा नदीकाठचा गावांसाठी सहा केटी वेअरचे प्रश्न मार्गी लागले आहेत.

मात्र, समान पाणीवाटप कायद्यामुळे आज अनेक बाबींवर निर्बंध आले आहेत. गावाच्या विकासासाठी संकटकाळी मदतीचा हातभार लावण्यास प्रेरणा सारख्या पतसंस्था पुढे आल्या असून या माध्यमातून शेती व गावाचा विकास होऊन गाव समृद्ध होईल, असे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe