अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे लॉकडाऊन अनेकदा कठोर निर्बंध लावण्यात आले होते.
नुकतेच कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती काहीशी सुरळीत होत असल्याने जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे. यामुळे शुकशुकाट असलेली शहरातील रस्ते पुन्हा एकदा गजबजले आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आल्याने आजपासून नगर जिल्हा अनलॉक झाल्याचा मोठा दिलासा नगरकरांना मिळाला आहे. शहरातील, मॉल, व्यापार पेठा, हॉटेल, रेस्टॉरंट, क्रीडा मैदान, समारंभ आता सुरू राहणार आहेत.
मंदिर, मशीद, गुरुद्वार, चर्च, विहार मात्र बंद राहणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नगर जिल्हा पॉझिटिव्हिटी रेट कमी असला, तरी नगरकरांना सोशल डिस्टंसिंगचा वापर करून कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात ठेवावी लागणार आहे.
पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास असे निर्बंध पुन्हा लागू शकतात यासाठी सावधानता बाळगावी लागणार आहे. दरम्यान आज सकाळी 8 वाजता शहरातील व्यापार्यांनी दुकानांची शटर उघडून दुकानांची साफसफाई सुरू केली.
दहा वाजल्यापासून दुकानात ग्राहक खरेदीसाठी गर्दी करू लागले. ज्या ग्राहकांच्या चेहर्यांवर मास्क नसेल त्यांना मास्क लावण्याच्या सूचना देताना दुकानदार दिसून आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम