राज्यात कोण खूश आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांची सरकारवर टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-  राज्यात सध्या जो काही कारभार सुरू आहे त्यामुळे कुठलाही वर्ग खूश नाही. आज आरोग्यसेवक, शिक्षक, तरुण वर्ग सारेच आपले वेगवेगळे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे राज्यात कोण खूश आहे? असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

ते नागपूरला वैयक्तिक दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, माझ्यावर पक्षाने नवी जबाबदारी दिली आहे ती योग्यरीत्या पार पाडण्यासाठी आधी पक्षबांधणी करण्याचे ठरविले आहे. मी इतर पक्ष काय करतात याचा विचार करीत नाही, मला माझा पक्ष वाढविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार मी करतो. राज्य सरकारने शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली त्यावर बोलताना ते म्हणाले, महापुरुषांच्या जयंत्या आपण सणासारख्या साजऱ्या केल्या पाहिजे.

सरकारने शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी दिली पाहिजे. मिरवणुकीला परवानगी नाकारून शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच असे झाले असल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

भविष्यातील आव्हानांबाबत ते म्हणाले, आपला देश स्वतंत्र होऊन इतके वर्षे झाले, पण आपण अजून बेसीक प्रश्न सोडवू शकलो नाही. त्यामुळे आधी आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. कुठे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्याबाबत माहिती मिळाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe