तिची वाट पाहता पाहता….

Ahmednagarlive24
Published:
file photo
file photo

१ जून रोजी महामंडळाच्या लाल परीचा ७१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त एसटी सोबतच्या कडूगोड आठवणींना उजाळा देण्याचं ठरलं.. त्यातील पहिला भाग तुमच्यासाठी..

प्रथम एसटी ची गाठ पडली मी अगदी लहान असताना मामाच्या गावाला आईसोबत जायचो तेव्हा. तेव्हापासून ते २०१७ पर्यंत म्हणजे मी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असेपर्यंत लालपरीशी खूप जवळचं नातं एकदम फेविकॉल च्या जोडासारखं राहीलं. अजूनही आहे, पण असं मोटारसायकल सारखी नवीन गर्लफ्रेंड मिळाल्यावर लालपरी सोबत ब्रेकअप झाल्यासारखंच !!

एसटी प्रवासातील गूढं-गुपितं आम्हालाच माहिती

आज OLA, UBER आणि मेट्रो च्या जमान्यात सुद्धा अनेक डोंगरवस्त्यांपर्यंत अगदी कच्च्या रस्त्याने दळणवळण आणि रोजनिशी संपर्काचं साधन म्हणजे एस टी ! खेडोपाड्यात राहणाऱ्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी जवळच्या शहरात जावं लागतं.

त्यांना जाण्यायेण्याचं एकमेव साधन एसटी हे होतं, आणि आताही बऱ्याच प्रमाणात आहे. आईसोबत मामाच्या गावाला निघायचो तेव्हापासून एसटीसाठी स्टँड वरती अनेक प्रकारचे लोक पाहायला मजा यायची, ते गजबजलेपण एका कुटुंबासारखं भासायचं.

ओळख नसतानाही माणसं एसटी येईपर्यंत एकमेकांची खुशाली करत गप्पा मारायचे. नंतर मात्र एस टी आली रे आली की बगलेत अडकवलेली पिशवी धरून म्हातारे सुद्धा धूम ठोकायचे, खिडकीतून आपली जागा पकडून ठेवायला.

आत गेल्यावर आपण टाकलेला रुमाल अथवा पिशवी गायब झाली की म्हातारा/म्हातारी अक्खी एसटी डोक्यावर घ्यायची. चांगल्या ठेवणीतल्या जड शिव्या हासडून जागा मिळवल्याशिवाय म्हातारीच्या आत्म्याला शांती मिळत नसे.

त्यात कंडक्टर मास्तर चांगला असला म्हणजे सुट्ट्या पैशाचे वांदे असले तरी चालू काम होऊन जायचं, नसेल तर म्हाताऱ्या माणसाला बोलणे ऐकत बसावं लागायचं. असो सुट्ट्या पैशांवरून अजूनही कंडक्टर प्रवासी पुराण एसटीत सुरूच असतात, फक्त दोन्ही पार्ट्या भांडणात तरबेज असाव्यात.

एसटीच्या प्रवासात सोबत कुणी नसेल तरी शेजारच्या सीटवर बसलेला एखादा गृहस्थ गप्पा मारायला भेटून जातो. कधी कधी व्यक्तीच्या प्रवृत्तीवरून समोरचा म्हातारा किंवा व्यक्ती आपुलकीने म्हणा किंवा चौकस बुद्धीने म्हणा आपलं सगळं काही खोदून खोदून विचारत असतो.

कुणाचे फायद्याचे, बिनकामाचे सल्ले भेटतात तर कुणाची व्यथा ऐकत बसावी लागते. गावाकडच्या माणसांना माणसाला माणसासारखं वागवणूक देण्याची विवेकबुद्धी होती(आता कमी झाली) एसटी प्रवासात एकमेकांना विश्वासाने आणि प्रेमाने खाऊची देवाणघेवाण करणारा एक काळ होता. तोही मी अनुभवला. 

file photo

हात केला की ती थांबते

पाचवी ते दहावी पर्यंत गाव जवळ असल्याने सायकल किंवा पायी प्रवास असायचा, तेव्हा नवीन सायकल शिकलेलो, आमच्यासाठी एसटी म्हणजे भर्रकन येऊन छातीत धडकी भरवुन जाणारा प्राणीच होता.

अजूनही एखादं विमान चालवतो की काय, अशा अविर्भावात एसटी चालवणारे चालक गावच्या रस्त्यावर कुप्रसिद्ध आहेत. अकरावी साठी जेव्हा शिरूर ला जायची वेळ आली तेव्हा मात्र एसटी हाच परवडेबल पर्याय होता.

महिन्याचा पास परवडणारा असल्याने बहुतांशी विद्यार्थी एसटी ने येजा करत. त्यात श्रीगोंदा एसटी डेपोचे कर्मचारी म्हणजे प्रवाश्यांची भयानक सेवा देणारी जमात. तेवढा कामाचा ताणही असतो त्यांच्यावर म्हणा.

श्रीगोंदयापासून शिरूर पर्यंत सतरा गावातील विद्यार्थी आणि हाफ तिकीटवाले म्हातारे सांभाळणं त्यांच्यासाठी जिकिरीचं काम असेल. मग भरलेली एसटी स्टँड वरती न थांबवता स्टँडच्या थोडं पुढे किंवा मागे थांबवणं, एखादा विद्यार्थी गावातील अधिकृत बस थांबा नसलेल्या एखाद्या वस्तीच्या फाट्यावर थांबला असेल तर बसमध्ये जागा असूनही त्याला बस न थांबवणं इतकी सेवेशी प्रामाणिक ही जमात.

ऐसा प्रवास पुन्हा होणे नाही !

file photo

आम्हीही ११ वी ते द्वितीय वर्षापर्यंत अशाच आमच्या बस थांबा नसलेल्या फाट्यावर थांबत असू. कारण गावात जाणं शक्य नसे.

बससाठी शिरूर ते देवदैठण प्रवास अवघा १५ मिनिटांचा तरीही सकाळी 8 वाजता घरातून पडलेला आमच्यासारखा होतकरू विद्यार्थी समोरून ५ एसटी बस न थांबता वाकुल्या दाखवून गेल्यामुळे थेट कॉलेजच्या जेवणाच्या सुट्टीत म्हणजे ११- १२ वाजता शिरूरला पोचायचा. फाट्यावर एवढा वेळ थांबलेला पाहून गावातल्या दूध डेअरीत गेलेले काका, बाबा परत यायचे तरीही आम्ही तिथेच उभे ! त्यांच्याकडूनही स्वतःची चेष्टा करून घ्यायची.

ते विचारत “चल यायचं का घरी ?” त्याच रडवेल्या झालेल्या चेहऱ्यावर कसंतरी हसायचं की परत एसटीची वाट पाहत बसायचं. कधी कधी एसटी थांबत नाही हे लक्षात आलं की आडवं जाऊन उभं राहावं की काय असं वाटे.

हे परंपरागत चालत आलेलं होतं. माझ्या काका, दादांच्या काळात त्यांनी वैतागून एसटी ला मागून दगड मारण्याचे पराक्रम केले, त्यांची रवानगी झाली थेट शिरूरच्या पोलीस स्टेशन मध्ये. पोलिसांच्या धमक्या ऐकून कशीबशी त्यांची सुटका झाली हे खूप गंमतीने ते सांगतात. आम्ही तसा पराक्रम कधी केला नाही.

एसटी मध्ये बसल्यावर थोडं निवांत वाटे, की शेजारी बसलेल्या आजोबा आज्जींची (आपुलकीची) विचारपूस चालू होई. “कुठून आला ?, कितविला शिकतो ?, कोणत्या कॉलेजात जातो वगैरे” त्यात त्यांच्या नातवाच्या, नातीच्या कॉलेजचं नाव तेच असलं म्हणजे पुढचा प्रश्न “आमची छोटी हाये ना सी टी बोराला, ओळखतो का तिला ?” आता एवढ्या मोठ्या कॉलेज मध्ये यांची छोटी कोण आहे हे मला कसं समजणार हे त्या आजीआजोबांना समजावून सांगणं कठीण काम होतं. तरीही त्यांचा राग येत नसे. 

संध्याकाळी कॉलेज सुटलं की तोच गंभीर प्रश्न श्रीगोंदा गाडीत जागा मिळेल का ? शिरूर एसटी स्टँड वरती पूर्ण अंगाला अंग खेटून चेमटून जाईपर्यंत श्रीगोंदा गाडीचा दरवाजा बाहेर राहिलेला सज्जन गृहस्थ जोरात रेटून बसवत असे.

कारण श्रीगोंदयापर्यंत जाणारा प्रत्येक माणूस, हाफ तिकिटावाले म्हातारे कोतारे, शिरूरमध्ये शिकायला आलेल्या सगळ्या शाळा महाविद्यालयातील पोरं पोरी, कामगार, नोकरदार सगळ्यांची संध्याकाळी एकाच वेळी सुट्टी होते. पाऊण तासाला श्रीगोंदा एसटी असताना देखील ही गर्दी कधी चुकूनही कमी झाली नाही. शिरूर स्टँडवरती एवढी टच्च भरणारी एसटी बस फक्त श्रीगोंदा आणि त्यानंतर ओतूर बस. 

file photo

शिरूर बसस्थानकावर होमगार्ड चंदाबाईंची शिस्त

ह्या भल्या मोठ्या गर्दीवर अंकुश ठेवायला एक धीप्पाड व्यक्तिमत्व असलेल्या होमगार्ड चंदाबाई यांची स्टँडवरती अजूनही दहशत आहे. गर्दीत किमान उभं राहायला तरी जागा मिळावी म्हणून पोरं अनेक शकली लढवत.

एसटी चा आपत्कालीन दरवाजा उघडत, कुणी चालकाच्या दरवाजातून घुसखोरी करतात तर जास्तच चपळ पोरं थेट एसटी च्या खिडकीतून आत पाय घालत एसटीत शिरत. मग या पोरांना अशा खिंडी लढताना सापडले की पृष्ठभागावर चंदाबाईची निब्बर काठी बसते.

अनेकदा तर चंदाबाईंच्या तावडीत म्हातारे सुद्धा खिडकीतून एसटीत चढताना सापडले. आणि त्यांच्या पृष्ठभागाचं व्हायचं तेच झालं. “भाड्या एवढा डंगरा झालाय तरी खोडी गेल्या नाही का ह्या म्हाताऱ्याच्या” म्हणत चंदाबाई कुणाचीच हयगय करत नाही. मुख्य दरवाजातून जाणारे पोरंही बळाच्या जोरावर म्हातारे आणि मुलींना ढकलून थेट आत जायचे. अशा गर्दीत पाकिटमार हेरण्यातही चंदाबाई पटाईत आहेत.

आम्हाला या गर्दीत फक्त उभं राहायला किंवा फक्त गर्दीत तरंगायला जागा मिळाली तरी धन्य वाटे ! काही चालू पोरं पटकन सीट पकडून ते त्यांच्या सामानासाठी म्हणजेच आवडत्या मुलीसाठी राखीव ठेवत. ती आली की तिथे विराजमान होई. ह्या अशा एसटी प्रेमगाथा किती यशस्वी झाल्या माहीत नाही. पण एवढ्या गर्दीत कुणा विद्यार्थ्याने मुलींसोबत बेकार चाळे केले असं चुकूनही झालेलं आठवत नाही. स्टँड वरती मुलींच्या घोळक्याकडे तोंड वर करत चाललेल्या हौशी पोरांवर चंदाबाईंची नजर असे.

file photo

श्रीगोंदा गाडी तर गेली आता काय ??

श्रीगोंदा गाडीत जागा भेटली नाही तर, एसटी स्टँडवरच्या रेडिओ पद्धतीच्या जाहिराती, “चुरा लिया है तुमने जो दिलको..” सारख्या 19’s च्या गाण्यांच्या instrumental धून ऐकत बसायचं. त्यात एखादी सरकारी योजनेची जाहिरात, कुठे शिरूरच्या गल्ल्यांच्या नावांचा उल्लेख होत असायचा.

तेवढीच आमच्या ज्ञानात भर ! मधेच “ये चला पारनेर”, “बेलोंडीला (बेळवंडी) जायचं का ?” म्हणून ओरडणारे प्रायव्हेट गाड्यांवाले आम्हाला चिडीला लावून गेल्यासारखं होई.

मध्येच एखादी एसटी आली की कुणीतरी आजीबाई, आजोबा विचारपूस करत “कोनची गाडी लागली रं पिंट्या/बाळा ?” आमच्या बहुतेक गावांचे एसटी वेळापत्रक, एसटी चा नंबर तोंडपाठ झालेला असल्याने त्यांना पटकन “नारायणगाव गाडी आहे आजी!” म्हणून मोठयाने ओरडून सांगावं लागे.

किंवा पास काढण्याची खिडकी उघडी असेल तर पास काढत बसण्याचा अन्यायी कार्यक्रम चालू असे. त्यालाही ३ -४ तास उन्हात उभं राहावं लागे. नंतर स्मार्ट कार्ड आल्यावर थोडा वेळ वाचू लागला. या सगळ्यात खूप मानसिक चिडचिड होई, पण करता काय ! पर्याय नव्हता, आहे तीच परिस्थिती सर्वोत्तम पर्याय आमच्यासाठी होता.

एवढा वेळ स्टँड वरती उपाशी पोटी माश्या मारत फिरल्यावर ६:३०-७ वाजता घरी जाण्यासाठी ३ बसेस त्या विसापूर, हंगेवाडी आणि म्हसे. त्यामुळे घरी लेट ८ पण पर्यंत पण थेट पोहोचत असू. 

हा अध्याय झाला श्रीगोंदा गाडी नाही भेटली तर काय होतं त्याचा. पुढच्या महाआध्यायात आपल्याला श्रीगोंदा गाडीच्या गर्दीतून जागा मिळणार आहे. मग पाहा धिंगाणा ! तोपर्यंत स्टँडवरतीच थांबा. भेटू परत “तिची वाट पाहता पाहता – भाग २ मध्ये !

– तुषार वाघमारे, देवदैठण
९२७३१३००६३

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment