अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खून प्रकरणी सातही आरोपींना जन्मठेप !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-हिंमत जाधव खून प्रकरणात आज न्यायालयाने सर्व सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा एक लाख वीस हजार रुपये दंड ठोपले आहे. १३ सप्टेंबर२०१६ रोजी हिंमत जाधव हा त्याचा मित्र संतोष चव्हाण यासोबत अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याचे कामकाजासाठी दुचाकीवरून आलेला होता.

न्यायालयातील कामकाज संपवुन तो संतोष चव्हाण याचे गाडीवर मागे बसुन औरंगाबाद रोडने घरी जात होता. त्यांची गाडी इमामपुर घाटाजवळ असताना त्यांचे मागुन दुचाकीवर आलेल्या तिघांनी हिंमत जाधव याचेवर त्यांचेकडे असलेल्या बंदुकीतुन गोळया झाडल्या. त्यामुळे हिंमत जाधव खाली पडला व मोटारसायकल घसरली.

झालेल्या प्रकारामुळे घाबरून संतोष चव्हाण याने घाटाखाली चहा पिण्यासाठी त्यांची वाट बघत असलेल्या लक्ष्मण कुसळकर यांचेकडे धाव घेतली. दरम्यानच्या काळात हिंमतवर झालेल्या गोळीबाराची माहिती त्याचे घरच्यांना तसेच पोलीसांना मिळाल्यामुळे घटनास्थळी हिंमतचे वडिल, भाउ व पोलीस पोहचले.

घटनास्थळी हिंमत हा रक्ताच्या थारोळयात पडलेला होता व त्याचा जागीच मृत्यु झालेला होता. त्यानंतर हिंमतचे प्रेत शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. झाल्या प्रकाराबाबत संतोष चव्हाण याने एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन येथे तीन अनोळखी व्यक्तींविरुध्द फिर्याद दिली.

त्यानुसार एम.आय.डी.सी.पोलीसांनी भा.द.वि. कलम ३०२ व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. सुरूवातीस गुन्हयाचा तपास एम.आय. डी.सी.पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरी.राहुल पवार यांनी केला. तदनंतर मयत हा भिल्ल समाजाचा असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रकरणाचा पुढिल तपास सहा.पोलीस अधिक्षक आनंदा भोईटे यांनी केला व बहुतांश साक्षीदारांचे जबाब,

काही आरोपींना अटक, पंचनामे, हत्यारजप्ती इ.महत्वपुर्ण बाबी पुर्ण केल्या. त्यानंतर आनंदा भोईटे यांची बदली झाल्याने प्रकरणाचा पुढिल तपास सहा.पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी केला व उर्वरीत आरोपींना अटक करून पंचनामे, हत्यारजप्ती केले.

सदर प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर सहा.पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी मा.न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा.जिल्हा न्यायाधीश श्री.एस.आर.जगताप साहेब यांचे समोर झाली व त्यांचेकडे सरकार पक्षाकडुन सहाय्यक सरकारी वकील श्री.केदार गोविंद केसकर यांनी एकुण २५ साक्षीदार तपासले.

माहे फेब्रुवारी २०२० मध्ये मा.जिल्हा न्यायाधीश श्री.एस.आर.जगताप साहेब यांनी रत्नागिरी येथे बदली झाल्याने प्रकरणातील पुढिल कामकाज, सरकार पक्षाचा युक्तिवाद व आरोपींच्या वतीने युक्तिवाद श्रीमती.एम.व्हि.देशपांडे मॅडम यांचेसमोर करण्यात आले.

मा.न्यायालयासमोर आलेल्या एकुण पुराव्यानुसार आरोपी राजु शेटे याने मयताबरोबर असलेल्या शत्रुत्वापोटी आरोपी कृष्णा कोरडे, सोमनाथ मोरे, अजिनाथ ठोंबरे यांना हिंमतला मारण्याची सुपारी दिली व घटनेच्या दिवशी आरोपी संदिप थोपटे, राहुल दारकुंडे यांनी मयताचे लोकेशन गोळया झाडणा-या आरोपींना वेळोवेळी दिले.

तसेच आरोपी जावेद शेख याने गुन्हयात वापरलेल्या बंदुका इतर आरोपींना पुरविल्या ही बाब सिध्द झाली. सदर खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी संतोष चव्हाण, मयताचे वडिल अभिमन्यु, बहिण दिपाली तसेच फोटोग्राफर दादा शिर्के, सी.सी.टि.व्ही. तज्ञ ब्रजेश गुजराथी, शवविच्छेदन करणारे औरंगाबाद येथील डॉ.विकास राठोड,

कलिना मुंबई येथील बॅलेस्टिक एक्सपर्ट डॉ. मुलानी, सी.सी.टि.व्ही. व फोटो तज्ञ वर्षा भावे, तपासी अधिकारी श्री.राहुल पवार, श्री.आनंदा भोईटे व श्री.मनिष कलवानिया व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. मा.न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा,

कागदोपत्री पुरावा तसेच सहाय्यक सरकारी वकील श्री.केदार गोविंद केसकर यांचा युक्तिवाद ग्राहय धरून मा.न्यायालयाने आरोपींना दोषी धरले व त्यांना भा.द. वि.का.कलम ३०२,१२०ब अन्वये दोषी धरून प्रत्येक आरोपीस आजन्म कारावासाची व एकूण १,१९,000/-रूपये दंडाची शिक्षा दिली.

सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पो.हे.कॉ.बी.बी.बांदल, पो.कॉ.दिपक गांगर्डे यांनी सहाय्यक सरकारी वकील श्री.केदार गोविंद केसकर यांना सहाय्य केले. तसेच सदर प्रकरणाचे कामकाज यशस्वीरित्या चालविण्याकामी जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील यांनी सहाय्यक सरकारी वकील श्री.केदार गोविंद केसकर यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe