अहमदनगर ब्रेकिंग : त्या शिवसेना पदाधिकार्‍याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेच्या पक्षांतर्गत बैठकित एका युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने वंजारी समाजाबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह असून, या घटनेबद्दल समाजाच्या भावना तीव्र असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी केला.

तर संबंधीत युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने समाजाची माफी मागून प्रकरण मिटवावे. अशा जातीयवादी घटनेकडे दुर्लक्ष केले गेल्यास संपुर्ण महाराष्ट्रात वंजारी समाज पेटून उठणार असून, आंदोलनाची ठिणगी नगरमधून पडणार असल्याचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

जय भगवान महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सानप बोलत होते. शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन युवा सेनेच्या एका पदाधिकार्‍याने पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांना मारण्याची व वंजारी समाजाबद्दल जातीवाचक शब्द वापरल्याने वादाला तोंड फुटले आहे.

तर जातीयवादी शाब्दिक चकमकीवरुन वंजारी समाज विरुध्द शिवसेना हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहे. समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्‍या सदर पदाधिकार्‍याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी महासंघाने केली आहे. झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी महासंघाचे संपर्क प्रमुख श्रीकांत चेमटे,

जिल्हा उपाध्यक्ष मदन पालवे, बंटी ढापसे, शिवाजी पालवे, शरद मुर्तडकर, विकी वायभासे, शशीकांत सोनवणे, सुभाष निंबाळकर, संजय पाटेकर आदिंसह महासंघाचे पदाधिकारी व वंजारी समाजाचे ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सानप पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षांर्तगत वादाशी आमचे काही देणे घेणे नसून,

युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने वंजारी समाजाचा बंदोबस्त करु असे वादग्रस्त वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा वाद उफाळत असताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष समाजाच्या भावनेकडे दुर्लक्ष करीत आहे. पदाधिकार्‍यांनी हा वाद त्वरीत मिटवण्याची अपेक्षा होती.

मात्र यावरुन वंजारी समाजाची एकप्रकारे चेष्टा केली जात आहे. सदर पदाधिकार्‍याने समाजाची माफी न मागितल्यास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीला समाजबांधव लवकरच जाणार आहे. तरी देखील न्याय न मिळाल्यास संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची भूमिका घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपर्क प्रमुख श्रीकांत चेमटे यांनी माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या निधनानंतर काही महिन्यातच अशा पध्दतीने शिवसेनेत जातीयवाद उफाळून येत असेल तर ते निषेधार्ह आहे. शिवसेना पक्षात कधीही जातीयवादाला थारा देण्यात आलेला नाही. पदाधिकार्‍यांनी मोठ्या जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

घडलेला प्रकार हा निर्लज्जपणाचा कळस आहे. जातीयवादी प्रवृत्ती पक्षाचा व देशाचा घात करणारी असून, याचा वेळीच बंदोबस्त करण्याचे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना त्यांनी आवाहन केले.

बंटी ढापसे म्हणाले की, पक्षांतर्गत वाद होऊन जातीवादी वक्तव्य करण्यात येते हे अत्यंत चुकीचे आहे. या घटनेमुळे समाजाचा एकप्रकारे अनादर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा वाद विकोपाला जाण्यापेक्षा प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment