Amboli Tourist place: पावसाळ्यात आंबोलीला गेलात आणि ‘ही’ ठिकाणी नाही पाहिली तर मग काय पाहिले? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
aamboli tourist place

Amboli Tourist place:- पावसाळ्यामध्ये सगळीकडे आपल्याला हिरवाईने नटलेल्या रस्त्यांच्या आजूबाजूचा परिसर, हिरवाईने भरलेले घाटमाथे, घाट रस्त्यांवरून प्रवास करताना खळाळून वाहणारे धबधबे आणि ओसंडून वाहणारी नदी नाले अशा प्रकारचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. याकरिता अनेकजण पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा बेत आखतात.

पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात फिरण्यासारखे अनेक ठिकाणे असून प्रत्येक ठिकाणे ही निसर्गाने समृद्ध आहेत. परंतु यामध्ये आंबोली हे ठिकाण खूपच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून या ठिकाणी असलेल्या धबधबा व आंबोलीच्या आजूबाजूला असलेली निसर्गरम्य ठिकाणे खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील आंबोलीला जाण्याचा प्लान बनवायचा असेल तर या ठिकाणी दिलेली माहिती तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल.

 आंबोली नेमके कुठे आहे?

आंबोली हे हिल स्टेशन असून ते महाराष्ट्रातील कोकणात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची जान आणि शान असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हे ठिकाण वसलेले आहे. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आंबोलीला गेला तर तुम्ही जणू पृथ्वीवरील स्वर्गाचाच विहार केला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या ठिकाणी असणारा गार गार वारा तसेच ओली चिंब झालेले फुले आणि झाडे, पक्षांचा किलबिलाट आणि सगळीकडे पसरलेले दाट असे धुके आपल्या मनाला मोहून टाकते.

 आंबोली आणि परिसरात पाहण्यासारखी पर्यटन स्थळे

1- आंबोली धबधबा आंबोलीच्या घाटामध्ये हा प्रसिद्ध असा आंबोली धबधबा असून फक्त फोटोशूट करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी भेट देतात. तुम्ही जेव्हा या धबधब्याला भेट देतात तेव्हा तुमच्या स्वागताला असंख्य माकड त्या ठिकाणी हजर असतात. या ठिकाणी छोट्या छोट्या पत्रांच्या शेडमध्ये तुम्हाला कांदे भजी किंवा मिरची भजी, वडापाव, मिसळ तसेच आंबोळी व डोसा तसेच गरमागरम चहा पिण्याचा देखील आनंद लुटता येतो व पावसामध्ये चिंब भिजता देखील येते.

2- नांगरतास धबधबा नांगरतास धबधबा आंबोली पासून दहा किलोमीटर अंतरावर असून तो एका रुंद दरीमध्ये आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी धनगर बांधवांचे एक छोटे मंदिर आहे. नांगरतास धबधब्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे दोनशे फूट खोल दरीतून याचा प्रवाह पुढे सरकतो.

3- महादेव गड जेव्हा तुम्ही आंबोलीत जाल तेव्हा तुम्हाला उजव्या बाजूला एका जंगलातून कच्चा रस्ता जाताना दिसतो. या रस्त्याने पुढे तीन ते चार किलोमीटर गेलात की महादेव गड आहे. या ठिकाणचे दृश्य बघता यावे म्हणून उंचीवर थांबण्याकरिता व बसण्यासाठी खास व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी अंगाला भावणारा थंडगार वारा तसेच महादेव गडच्या कपारीतून वर आलेला सूर्य, घनदाट जंगले आणि त्या ठिकाणी असलेली शांतता अनुभवायची असेल तर महादेव गड हे ठिकाण चांगले आहे.

4- शिरगावकर पॉईंट या पॉईंटवरून तुम्ही निसर्गाचा सुंदर नजारा पाहू शकतात. तसेच सूर्योदय आणि सूर्यास्त तुम्हाला बघायचे असेल तर शिरगावकर पॉईंट हे एक उत्तम ठिकाण आहे. आंबोली बस स्टॉप पासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर शिरगावकर पॉईंट आहे.

5- सनसेट पॉईंट तुम्ही आंबोली घाटात प्रवास करत असताना नागमोडी वळणांमध्ये वळणे घेता घेता बाजूच्या एका खोल दरीमध्ये तुम्हाला हिरवेगार असे दाट जंगल बघायला मिळते. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला सनसेट पॉईंट असून येथे गाड्या थांबवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही सूर्यास्ताचे अनोखे दृश्य पाहू शकतात.

6- कावळेसाद धबधबा आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. या आंबोली जवळ गेळे गाव असून या ठिकाणी कावळेसाद पॉईंट नावाचा एक धबधबा आहे. या धबधब्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा आहे. म्हणजेच या ठिकाणी धबधब्याचे जे काही पाणी दरीत कोसळते व दरीतून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे ते पाणी पुन्हा वर जाते. या ठिकाणी जाऊन चिंब भिजण्यात स्वर्गसुख आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.

7- रामतीर्थ धबधबा हिरण्यकेशी नदीला जेव्हा पाणी येते तेव्हा रामतीर्थ धबधबा वाहायला लागतो. हा धबधबा आजरा तालुक्यात असून या ठिकाणी पर्यटकांच्या मनाला भुरळ पडते असा हा धबधबा आहे.

याशिवाय तुम्ही या ठिकाणी राघवेश्वर पॉईंट, रांगणा किल्ला तसेच दुर्ग ढकोबा ट्रेक, तसेच त्यापुढे सावंतवाडीला जाऊन लाकडी खेळण्याचा बाजार देखील पाहू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe