अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यात वाळू तस्करांनी धुडगूस घातला आहे. तालुक्यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावांतील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा सुरू आहे.
निष्क्रिय प्रशासनामुळे या वाळूतस्करांना पाठबळ मिळत आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसात हा वाळूउपसा थांबला नाही तर

श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या निषेधासाठी आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते अतुल लोखंडे यांनी दिला आहे.
दरम्यान लोखंडे यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की वाळूतस्कर माठ, म्हसे व परिसरातील गावांतून प्रचंड प्रमाणात अवैध वाळूउपसा करीत आहेत.
दररोज 100 ते 150 ट्रकद्वारे वाळूची अवैधरीत्या वाहतूक होत आहे. या अवजड वाहतुकीमुळे या दोन गावांबरोबरच शेजारील राजापूर, हिंगणी, पिंपरी कोलंदर, ढवळगाव,
देवदैठण, बेलवंडी फाटा आदी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून त्यांची दुर्दशा झाली आहे. तसेच वाळूमाफिया स्थानिक तरुणांसह जमावाने फिरत असल्याने,
या दोन्ही गावांसह परिसरातील सुजाण नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. शेजारील शिरूर (जि. पुणे) येथील महिला तहसीलदारांना याची जाणीव होताच त्यांनी आपली हद्द सोडून अगदी बेधडकपणे या भागात येऊन कारवाई केली.
मात्र, तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी श्रीगोंदे तहसील कार्यालय व बेलवंडी पोलिस ठाण्यात गांधीगिरी करून अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved