अहमदनगर : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून पोळा सणाकडे पाहिले जाते. सध्या जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सततच्या दृष्काळामुळे हातात पैसा नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, तर दुसरीकडे चारा पाण्याची टंचाई असल्याने जिल्ह्यातील लाखभर पशुधनाची दावन अजूनही छावणीतच उभी आहे. दृष्काळाचे भीषण सावट जिल्ह्यातील शिवारावर अणि बैल पोळ्याच्या सणावर पडलेले आहे. .
सध्या गावोगावच्या बाजारपेठांमध्ये बैल सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. मोहरकी, घुंगरमाळ, कमरी बाशिंग, बैल पेंट, पायातील घुंगराचे वाळे, सुताचे रंगीत गोंडे, रंगबेरंगी मुरक्या, वेसणी, कासरे, पाटीवरील झुली, बेगड इत्यादी साहित्याने दुकाने सजली आहेत.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत साहित्याच्या किमती घटल्या असल्या तरी, परंतु सतत तीन वर्षांच्या दृष्काळामुळे घटलेले पशुधन व जिल्ह्यातील काही गावांमध्ये अजूनही पावसाचा टिपूसही पडला नाही. त्यामुळे त्या गावांमधील पशुधन अजूनही चाराछावणीतच अडकून पडलेली आहेत. बैलांना धुण्यासाठी पाणीच नसल्याने हा सण कसा साजरा करायचा हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. .
गेल्या तीन वषांर्पासून पडत असलेल्या कोरड्या दुष्काळामुळे यंदाही पाणीटंचाईची तीच परिस्थिती निर्माण झाल्याने पोळा सण कोरडाच जाणार का, अशी भीती शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात निर्माण झाली आहे.
खपाटीला गेलेले जलसाठे, खरिपाच्या जेमतेम पेरणीवर पावसामुळे आलेली पिके हातची जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामन्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. पाऊस नसल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांच्यावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.