अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे.
ह्या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी काल एक सूचक ट्विट केले होते.त्यात त्यांनी एक शेर पोस्ट केला होता. भेटीआधीचे हे सूचक ट्विट होते, का याची उत्सुकता आता लागली आहे.
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या वेळी भाजपकडून किंवा सेनेकडून इतर कोणीही नेते उपस्थित नव्हते. या दोघांमधील चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.
मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यातील सध्याचे कटुतेचे संबंध लक्षात घेता हे दोन नेते भेटणे महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान या भेटीबाबत बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं.
पण आत्ताच या भेटीबाबत काही सांगता येणार नाही असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं, “संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.
त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली.
भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय भूंकपाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या भेटीमागचे अनेक तर्क काढण्यात येत आहेत.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार या चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल युतीच्या बाजुने लागला.
मात्र, मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये ताटातूट झाली. त्यानंतर शिवसेनेने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत केले. तसेच तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली. ज्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीना काही कारणाने कुरबूर सुरु आहे. त्यामुळे याभेटीबाबत चर्चा अधिक रंगत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved