वृत्तसंस्था :- पुढील आठवडाभर राज्य मुख्यत: कोरडे राहणार असल्यामुळे किमान तापमानात घट होणार आहे. बहुतांश ठिकाणचे तापमान सरासरीच्या जवळपास जाणार आहे.
त्यामुळे गारठा वाढणार असून, काही ठिकाणी धुके पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील तीन ते चार दिवस राज्यात ढगाळ हवामान होते.
गुरुवारी (ता. १२) दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटदेखील झाली होती.
ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन गारठा कमी झाला होता. आता पुन्हा राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत हवामान अंशत: ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.