अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच कमी झाला आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एक दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्याबरोबरच अनेक तालुके कोरोनमुक्तीकडे वाटचाल करत आहे. यातच सुरुवातीला कोरोना संक्रमणाने ग्रासलेल्या संगमनेर तालुक्यातून दिलासादायक वृत्त हाती येत आहे.
चालू महिन्यात तालुक्याच्या रुग्णगतीत मोठी घट झाल्याने संगमनेरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अगदी चार रुग्णांपासून सुरु झालेले कोविडचे संक्रमण गेल्या सहा महिन्यांच्या काळात तालुक्यातील 89.41 टक्के गावांमध्ये पसरल्याने चार हजारांहून अधिक नागरिकांना कोविडची लागण झाली होती.
मात्र आरोग्य यंत्रणांनी केलेल्या व्यापक परिश्रमांमुळे सद्यस्थितीत कोविडचा मुक्काम तालुक्यातील अवघ्या 28.24 टक्के गावांपर्यंतच मर्यादीत असून 104 गावांनी आपले शिवार ‘कोविड मुक्त’ केले आहे.
तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 95 टक्क्याच्या पुढे गेले असून मृत्यूदरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरने संगमनेरकरांना एकामागून एक दिलासे दिल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाने आजवर एकूण 20 हजार 493 संशयितांची स्राव चाचणी केली, त्यातून 4 हजार 104 रुग्ण संक्रमित असल्याचे समोर आहे.
आजच्या स्थितीत 3 हजार 910 रुग्ण बरे होवून घरी गेले आहे. तसेच आज केवळ 154 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची गतीही आज 95.27 टक्के आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved