अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जागेवरुन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वांबोरी (ता. राहुरी) येथील रवीना सारवन व साहिल सारवन या दांम्पत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण केले.
या उपोषणाला अ.भा. मेहतर समाज संघटना व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या उपोषणात मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष तालेवर गोहेर, राहुल लखन, नरेंद्र तांबोली, धीरज सारसर, बहुजन मुक्ती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, सीमा मुलतानी, अय्युब शेख, संजय कांबळे सहभागी झाले होते.

मौजे वांबोरी (ता. राहुरी) ग्रामपंचायत समोर राहणार्या मेहतर वाल्मिकी समाजाच्या कुसुमबाई सारवन या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये सफाई कर्मचारी या पदावर कार्यरत होत्या. 2 एप्रिल 1980 रोजी स्थानिक ग्रामपंचायतमध्ये सफाई कर्मचारीच्या आवासाची व्यवस्था म्हणून ठराव घेऊन मौजे वांबोरी येथील
संपूर्ण सि.स.नं. 415 मधील जागा कुसुमबाई यांना बक्षीस पत्र देण्यात आली होती. या जागेवर सारवन कुटुंबीय अनेक वर्षापासून राहत आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये गावातील सचिन पठारे (रा. वांबोरी, सोनई वेस) नामक व्यक्ती सदर मिळकतीवर हक्क सांगून त्यावर बांधकाम करीत आहे.
सदर कुटुंबीयांनी त्यास मज्जाव केला असता त्याने सर्व परिवारास जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली आहे. सदर व्यक्तीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी सारवन परिवाराने केली आहे. यासाठी पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देखील देण्यात आले.
पोलिसांकडून सदर आरोपीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेले नाही. पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेले असता आमचे म्हणणे ऐकून न घेता तुच्छ वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. तर प्रकरण आपसात मिटून घेण्याचे अजब सल्ले पोलीस देत असल्याचा आरोप सारवन कुटुंबीयांनी केला आहे.
अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन दिल्यानंतर पठारे यांचे वडील अशोक पठारे, पत्नी अर्चना पठारे यांनी पुन्हा शिवीगाळ करून आमच्या परिवारा विरोधात घातपात करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. वांबोरी येथे मेहतर समाजातील सारवन हे एकच कुटुंबीय वास्तव्यास आहे.
सदर आरोपी व त्यांच्या नातेवाईकाकडून सारवन कुटुंबीयास धोका निर्माण झाला आहे. तातडीने आरोपीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करुन सारवन कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी उपोषण कर्त्यांनी केली आहे. सदर प्रकरणी उचित कार्यवाही करण्याचे जिल्हादंडाधिकारी यांचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved