अत्यंत दुर्दैवी! मुलाची वाट पाहणाऱ्या वडीलांनी सोडले प्राण; कुटुंब झाले निराधार

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी इसाक तांबोळी नावाचा तरुण कुकडी नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली होती. अनेक दिवस झाले तरी मुलाचा काही शोध लागत नसल्याने हताश झालेल्या इसाक च्या वडिलांनी देखील देह त्यागला.

एकीकडे वडिलांनी प्राण सोडले आणि दुसऱ्या दिवशीच ईसाकचा मृतदेह आढळून आला. तांबोळी कुटूंबावर ओढावलेल्या या करूण प्रसंगामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रांजणगाव गणपती येथे रिक्षाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असलेला ईसाक तांबोळी हा कुटुंबासमवेत पत्नी, दोन मुले व वडीलांसह राहत होता.

काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील जवळे येथे भाडे घेउन आलेला इसाक हातपाय धुण्यासाठी कुकडी नदीपात्रात उतरला व पाय घसरून पडला व बुडाला.

पोलिस तसेच इसाकच्या नातेवाईकांनी चार पाच दिवस शोध घेउनही त्याचा शोध लागला नाही. सर्व प्रयत्न करूनही इसाकचा शोध न लागल्याने पोलिस प्रशासन तसेच नातेवाईकांनी शोध कार्य थांबविले होते.

दरम्यान शुक्रवारी इसाक ज्या ठिकाणी पडला तेथेच त्याचा हात दिसून आला. नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने कपारीत आडकलेला मृतदेह दिसून आला.ईसाक बेपत्ता झाल्यापासून वडील रहेमान हे चिंतेत होते.

तब्बल दहा दिवस झाले तरी इसाकचा शोध न लागल्याने खचून गेलेल्या रहेमान तांबोळी यांना गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराचा तिव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.एकीकडे मुलाची वाट पाहून थकलेल्या वडीलांनी प्राण सोडले व दुसरीकडे दुसऱ्या दिवशी ईसाकचा मृतदेह मिळून आला.

ईसाकचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आल्यानंतर नदीपात्राशेजारीच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved