प्राचार्य शिवाजीराव देवढे यांना ‘गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर.

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव (प्रतिनिधी) :- येथील न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चे माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे यांना त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गेवराई येथील गौरीपुर उत्सव कृती समितीचा ‘गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे.

मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा. तथास्तु मंगल कार्यालय गेवराई येथे मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. सदर पुरस्काराची घोषणा गौरीपुर उत्सव कृती समितीच्या बैठकीत प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली.

प्राचार्य शिवाजीराव देवढे हे गेवराई येथील आर. बी. अट्टल महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करीत असतांनाच ग्रामीण साहित्याला वाहिलेले ‘रान मळा’ हे नियतकालिक चालवीत होते. ‘रान मळा’ च्या साहित्यिक वाटचालीतूनच पुढे प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर,

प्रा. डॉ. बा. ह. कल्याणकर, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, बाबाराव मुसळे, ग्रामीण कथाकार विष्णू गुंजाळ यांसारखे अनेक दिग्गज साहित्यिक घडले. प्राचार्य शिवाजीराव देवढे यांची वाटणी (कथा संग्रह), संगर (एकांकिका संग्रह) तसेच विविध विषयांवरील संपादित केलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी केलेल्या साहित्यिक योगदानामुळे गेवराई तालुक्याच्या वैभवशाली साहित्यिक परंपरेला सुवर्ण झळाळी मिळाली. त्याच बरोबर त्यानी प्राध्यापक म्हणून केलेल्या ज्ञानदानामुळे गेवराई तालुक्यातील आर. बी. अट्टल महाविद्यालयातून अनेक नामवंत विद्यार्थी घडले.

त्यामुळे गेवराई तालुक्याला प्राचार्य शिवाजीराव देवढे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान देखील मोलाचे ठरते. त्यामुळेच त्यांचा जीवनगौरव पुरस्कार २०२० देऊन सत्कार करण्यात येणार आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे या डोंगराळ भागातील खेडेगावात १८ फेब्रुवारी १९५१ साली जन्मलेल्या प्राचार्य शिवाजीराव देवढे यांचे

प्राथमिक शिक्षण नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथे, पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण शेवगाव तालुक्यातील खामगाव येथे तर आठवी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण रेसिडेंन्सीअल हायस्कूल मध्ये झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी एम. ए. हिंदी हे पदव्युत्तर शिक्षण,

बी. जे. ही पत्रकारितेतील पदवी तसेच कलमलाकर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य शास्त्राची पदविका देखील घेतली. गेवराई येथील आर. बी.अट्टल महाविद्यालयात सलग ११ वर्षे अध्यापनाचे काम केल्यानंतर ते १९८६ मध्ये शेवगाव येथील न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून रुजू झाले. एम. ए. हिंदी व पत्रकारिता क्षेत्रातील बी.जे. ही पदवी घेतलेल्या प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी या महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन केले.

एक उपक्रमशील प्राध्यापक व कर्तव्यदक्ष प्राचार्य म्हणून त्यांची नगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात ख्याती होती. शेवगाव मध्ये सलग १८ वर्षे प्राचार्य पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी अहमदनगर, पारनेर, व टाकळी ढोकेश्वर येथे प्राचार्य पदाची धुरा त्यांनी सांभाळली. याकाळात कथा लेखन कार्यशाळा, एकांकिका लेखन, दिग्दर्शन, वाद विवाद स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थी, युवक आणि प्राध्यापकांना वक्ता म्हणून घडविले.

आपल्या प्राचार्य पदाच्या ३० वर्षांच्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले, त्यामुळेच त्यांच्या काळात महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. त्यांच्या मुशीतून अनेक विद्यार्थी पुढे नामवंत साहित्यिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते घडले. प्राचार्य शिवाजीराव देवढे यांच्यावर फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा प्रभाव असल्यामुळे

त्यांनी आयुषभर पुरोगामी चळवळीत काम केले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, प्राचार्य संघटना, व प्राचार्य महासंघ, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजन समिती, ग्रामीण साहित्य संमेलन आयोजन समिती, शब्दगंध साहित्य संमेलन आयोजन समिती, तसेच तिसऱ्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले,

प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांच्या आदेशावरून त्यांनी फुले, शाहु, आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारी क्रांतिसिंह नाना पाटील आणि शाहिद भगतसिंग यांच्या विषयी १०० हुन अधिक व्याख्याने देण्याचा संकल्प केला, त्यापैकी ७५ व्याख्याने अद्यापपर्यंत विविध महाविद्यालयातून दिली.

अध्यापन, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, वक्तृत्व, संघटन कौशल्य असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले व जिल्ह्याच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेले प्राचार्य शिवाजीराव देवढे यांना गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ.प्रल्हाद लुलेकर, आ.लहू कानडे, बापूसाहेब भोसले आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe