अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची जातेगाव घाट परिसरात गळा चिरुन जी निर्घृृण हत्या झाली, त्या हत्याकांडानंतर तब्बल ८७ दिवस उलटून गेले आहेत. मात्र या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठे अद्यापही फरारच आहे.
बाळ बोठेला पाठीशी घातलं जातंय, अशी शंका रुणाल यांनी व्यक्त केलीय. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या परवानगीविना दि. ५ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पोलीस यंत्रणेविरुध्द उपोषण करणारच, असा निर्धार रुणाल जरे यांनी व्यक्त केलाय.


पोलीस यंत्रणा बोठेला पाठीशी घालतेय ? या संर्दभात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात रुणाल जरे यांनी म्हटलं आहे, की रेखा जरे यांची हत्या होऊन प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांना बोठे सापडत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा बोठेला पाठीशी घालतेय, असं वाटू लागलंय.
बोठे इतक्या दिवस फरार कसा होऊ शकतो ?
अहमदनगर जिल्हा पोलीस दलात सक्षम अधिकारी असतानादेखील बोठे इतक्या दिवस फरार कसा होऊ शकतो, पोलिसांची गुप्त यंत्रणा काय करते आहे, या प्रकरणात पोलीस यंत्रणा काही लपवाछपवी तर करत नाही ना, असे अनेक प्रश्न रुणाल जरे यांनी या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत.

आम्हाला अद्यापही उत्तरे मिळालेली नाहीत !
मी आणि माझे वकील दिवसरात्र एक करुन पोलिसांना सहकार्य करत आहोत. जिल्हा पोलीस अधीक्षक, तपासी अधिकारी, मंत्री, आमदार या सर्वांना भेटून आम्ही या सर्वांसमक्ष हे प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र आम्हाला अद्यापही उत्तरे मिळालेली नाहीत.
चौकशी करावी आणि बाळ बोठेला अटक करा…
मोठं कट कारस्थान रचून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं आम्हाला समजलंय. हिंमत असेल तर चौकशी करुन दाखवा, असे संदेश दिले जात आहेत. या प्रकरणात राज्याचे पालकमंत्री, गृहमंत्री यांनी जबाबदारी घेऊन चौकशी करावी आणि बाळ बोठेला अटक करावी.
अटक करणं किती गरजेचं आहे, हे प्रत्येकाला माहित आहे.
यामध्ये पोलिसांवर मोठा दबाव आहे. गुन्ह्याची साखळी जर पाहिली तर मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा सकाळचा संपादक आहे. त्यामुळे मंत्री समोर येत नाहीत, स्पष्टीकरण देत नाहीत. मुख्य सूत्रधाराला अटक करणं किती गरजेचं आहे, हे प्रत्येकाला माहित आहे.

बाळ बोठेला लपविण्यामागे कोण आहे
मुख्य सूत्रधार बाळ बोठेला लपविण्यामागे कोण आहे, बोठे फरार असूनही त्याच्या घराला टाळे नाही, त्याची सर्व यंत्रणा घरातला कर्ता पुरुष घरी नसतानाही सुरळीत सुरु आहे. मी आणि माझ्या वकिलांनी वेळोवेळी पोलीस यंत्रणेला अर्ज दिले. मात्र अद्यापही उत्तरे मिळू शकलेली नाहीत.
जन्मठेप होईपर्यंत मी गप्प बसणार नाही.
माझी आई जरी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला जिल्हा उपाध्यक्षा आणि यशस्विनी महिला ब्रिगेडची अध्यक्षा असली तरी प्रथम ती एक स्त्री आहे. चार्जशीट दाखल होईपर्यंत माझा पोलिसांवर विश्वास होता आणि आहे.परंतू पोलीस यंत्रणेकडून बाळ बोठेला अटक होऊन आजन्म कारावास, जन्मठेप होईपर्यंत मी गप्प बसणार नाही.असं या निवेदनात म्हटलंय.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













