अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा, कॉलेज अद्यावही बंद ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांविना सुनसान असलेल्या शाळांमध्ये आता चक्क बिबट्या फिरू लागला आहे.
अकोले तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अकोले तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अमृतनगर व कॉलेज परिसरात बिबट्या दिसला आहे.

बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने गांभीर्याने लक्षात घेऊन तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, रोहित संजय देशमुख नावाच्या व्यक्तीला अमृतनगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास बिबट्या दिसला. रोहितने दुचाकीचा हॉर्न वाजवल्यानंतर बिबट्या त्या ठिकाणाहून पळून गेला.
त्यानंतर या बिबट्याने आपला मोर्चा कॉलेज परिसराकडे वळवला. तेथे माजी प्राचार्य मोरे यांचे चिरंजीव हेमंत मोरे यांच्या दोन महिन्याच्या पाळीव कुत्रीला बिबट्याने उचलून नेले.
त्यांच्या बंगल्याजवळ बिबट्याचे स्पष्ट ठसे आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी हा बिबट्या सायंकाळी उशिरा गणपती मंदिर परिसरात आरामात फेरफटका मारत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित परिसरात तातडीने पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved