Nashik News: नाशिक- पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा, यासाठी नाशिकसह सिन्नर आणि मनमाड येथे आज, बुधवारी (दि. ७) दुपारी ४ वाजेनंतर मॉकड्रिल होणार आहे. रात्री ७.३० नंतर या शहरांतील काही भागांत ब्लॅकआउटही केला जाईल. या मॉकड्रिलसाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नाशिकमध्ये मॉकड्रिलसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलिस, अग्निशमन दल, सिव्हिल डिफेन्स, एनसीसी, एनएसएस आणि भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. दुपारी ४ वाजता केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सराव होणार आहे. यात एअर रेड, फायर रेस्क्यू आणि ब्लॅकआउट अशा तीन टप्प्यांचा समावेश असेल. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, हा मॉकड्रिल नियमित सरावाचा भाग आहे. सोशल मीडियावर याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तर अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे.

सायरन वाजल्यानंतर काय करावे?
मॉकड्रिलदरम्यान सायरन वाजल्यास नागरिकांनी घाबरून न जाता शांतपणे काही पावले उचलावीत. सायरन हा एक अलर्ट आहे, त्यामुळे मोकळ्या जागेपासून दूर राहून सुरक्षित इमारतीत किंवा खोलगट ठिकाणी आश्रय घ्यावा. घरातील दिवे बंद करावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मॉकड्रिल म्हणजे युद्धजन्य परिस्थितीची तयारी आहे. यात पक्क्या इमारतीत थांबणे, भिंतींना चिकटून न उभे राहणे, खिडक्यांना प्लास्टिक कव्हर लावणे, काचांपासून दूर राहणे आणि बाथरूमसारख्या सुरक्षित जागेत आश्रय घेणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच, महत्त्वाच्या आस्थापनांवर हिरवे कव्हर टाकून त्यांचे संरक्षण करावे आणि लाइट बंद ठेवाव्यात.
…म्हणून नाशिकची निवड करण्यात आली
नाशिकची या मॉकड्रिलसाठी निवड का झाली? याचे कारण म्हणजे नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, देवळाली तोफखाना केंद्र, गांधीनगर आर्टिलरी सेंटर, एचएएल कारखाना आणि एकलहरे औष्णिक वीज केंद्र यासारख्या देशाच्या सुरक्षेशी निगडित आस्थापना. तसेच, मनमाड येथील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा इंधन डेपो आणि सिन्नरमधील थर्मल पॉवर स्टेशन यामुळे नाशिक सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मॉकड्रिलसाठी नाशिकसह सिन्नर आणि मनमाडची निवड केली आहे.
प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
प्रशासनाने मॉकड्रिलच्या स्वरूपाबाबत गुप्तता पाळली आहे. शहरात ज्या ठिकाणी सायरन बसवले आहेत, त्यांची तपासणी सिव्हिल डिफेन्स दलाकडून केली जात आहे. बंद असलेले सायरन सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. नागरिकांनी या सरावादरम्यान शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा मॉकड्रिल युद्धजन्य परिस्थितीत नागरिक आणि यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.