महिलांचे चुकीचे फोटो पोस्ट करणाऱ्यांना राज्यातील नव्या कायद्याचा बसणार दणका !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-  राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांना आळा बसवण्यासाठी राज्य सरकारकडून शक्ती कायदा आणला जात आहे. या कायद्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर तो केंद्र सरकारडे पाठवला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना याबाबत थोडक्यात माहिती दिली. महिलांचे सोशल मीडियावर चुकीचे फोटो टाकून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असून, अशा दोषी व्यक्तींना दोन वर्षांची शिक्षा शक्ती कायद्यांतर्गत मिळणार आहे.

तसेच, महिलांकडून खोटी तक्रार दाखल केली गेल्यास त्यांना देखील एक वर्षांची शिक्षा असणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. प्रस्तावित ‘शक्ती’ कायद्यानुसार, महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या प्रकरणात २१ दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करुन खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.

महिलांवरील अॅसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामिनपात्र करण्यात येणार आहेत. इतकचं नाही तर महिलांचा जर ई-मेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला तसेच त्यांच्यावर जर चुकीच्या पद्धतीची कमेंट करण्यात आली तर त्यासाठीही कडक शिक्षा होणार आहे. यासाठी दोन वर्षांसाठी तुरुंगवास आणि दंडाचाही समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News