नागपूर, दि.4 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच जिल्हयातही लॉकडाऊन सुरु असून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.
प्रशासनातर्फे विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचेही सहकार्य मिळत आहे. या काळात जनतेला अत्यावश्यक सेवेसोबतच नागरी सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी उद्योगांसह विविध नागरी सुविधांच्या सेवा सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक क्षेत्र पूर्ववत सुरु करण्यासाठी विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सोबत बैठकीत चर्चा करुन कळमेश्वर आणि हिंगणा भागातील उद्योग सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, नागपूर रेड झोन मध्ये असून सतरंजीपुरा, गांधीबाग, आशीनगर, मंगळवारी हे क्षेत्र कंटेनमेंटमध्ये आहे.
आता कंटेनमेंट एरिया वगळता, उर्वरित महापालिका झोन क्षेत्रात 10 टक्के शासकीय कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. तसेच या भागात यथास्थिती बांधकाम सुरु करण्यास परवानगी आहे.
कंटेनमेंट भागाच्या बाहेरच्या क्षेत्रातील निवासी क्षेत्रात किराणा (ग्रोसरी), होजीयरी, स्टेशनरी दुकाने सुरु करण्यास परवानगी असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागांमध्ये मद्य विक्री दुकाने वगळता उर्वरित दुकाने तहसिलदार, मुख्याधिकारी नगर परिषद, पोलीस निरीक्षक आणि त्या भागातील व्यापारी संघटनांना विश्वासात घेवून मार्गदर्शक सूचनांनुसार पाच दुकाने सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
सद्यस्थितीत लॉकडाऊन सुरु आहे, मात्र ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्रामध्ये तेथील आजुबाजुच्या परिसरातून येणाऱ्या कामगारांना व कर्मचारी वृंदास कुठल्याही परवानगीची गरज राहणार नाही.
ते आपआपल्या वाहनांनी येऊ शकतील, मात्र कर्मचारी व कामगारांनी शासनाच्या वाहनविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सर्वांना सोशल डिस्टन्सिग पाळणे अनिवार्य असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयातील अधिकारी वर्ग शंभर टक्के उपस्थिती व कर्मचारी वर्ग 33 टक्के उपस्थिती, अशारितीने कार्यालयाच्या कामकाजाला सुरुवात करायची आहे.
मात्र सर्वांनी मास्कचा वापर, साबण/सॅनिटॉझरचा वापर, खोकलण्याचे, शिंकण्याचे शिष्टाचार व सोशल डिस्टन्सिगचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहिल अन्यथा संबंधितांवर कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
परवानग्याबाबत
नागरिकांना ज्या जिल्ह्यात जायचे आहे तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुमती प्राप्त झाल्यानंतर जाण्याबाबतची रितसर परवानगी देण्यात येईल.
यासाठी नागपूर शहर क्षेत्रातील ई-पास परवानगी पोलीस आयुक्त देतील तर ग्रामीण क्षेत्रातील ई-पास परवानगी जिल्हाधिकारी कार्यालय देईल.
ई-पासची व्यवस्था सुरु होण्यापूर्वी केलेल्या शहरातील व ग्रामीणमधील परवानगी अर्जाबाबत, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत येत्या तीन दिवसात परवानग्या देण्यात येतील, असे बैठकीत ठरले.