मनरेगातून विविध कामांना चालना द्यावी – पालकमंत्री

Ahmednagarlive24
Published:

अमरावती, दि. 21 : टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

त्यानुसार जिल्ह्यात 557 गावांमध्ये 2 हजार 186 कामे राबविण्यात येत आहेत. रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने शक्य तिथे अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणू उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री श्रीमती ठाकूर या जिल्हा प्रशासनाकडून रोज माहिती व आढावा घेत आहेत. राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिलपासून लॉक डाऊनमध्ये थोडी शिथिलता आणून उद्योग व्यवसाय अंशतः सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

त्यानुसार अमरावती जिल्ह्यात तब्बल 256 लघु व मध्यम उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. या काळात ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगाच्या माध्यमातून कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या कामांमुळे रोजगारनिर्मितीसह विकासकामांनाही चालना मिळणार आहे.

मनरेगाअंतर्गत 557 गावांमध्ये 2 हजार 186 कामांना चालना देण्यात आली आहे. त्यानुसार आजमितीला 17 हजार 76 मनुष्यबळ रोजगारनिर्मिती होत आहे. मेळघाटात प्राधान्याने अधिकाधिक कामे राबविण्यात यावीत व टंचाई निवारणाच्या कामांनाही प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

शासनाने सोशल डिस्टन्सिंग विषयक निर्देशाचे पालन करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जलसंधारण, सिंचन विहिरी, पशुंसाठी गोठ्याचे बांधकाम, फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरुपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते, जलसंधारण, नाला सरळीकरण, सामूहिक विहिरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुलभ होणार आहे.

यातील जास्तीत जास्त कामांचा समावेश करून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सर्व गावात गावनिहाय मंजूर करण्यात आलेल्या कामांचे नियोजन करून त्यानुसार प्रत्यक्ष कामे सुरू करण्याच्या  सूचना जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

कामाच्या ठिकाणी खबरदारी घ्यावी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी प्रत्येकाने मास्क वापरावे, सामाजिक अंतराचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे दिसत असतील तर तत्काळ डॉक्टर कडे जावे. याबाबत दक्ष राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

लॉकडाऊनमुळे अर्थचक्राला गती देण्याच्या उद्देशाने अंशत: उद्योग व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी कटाक्षाने दक्षता सूचनांचे पालन करावे व त्यांच्याकडून तसे पालन होत असल्याची वेळोवेळी खातरजमा यंत्रणांनी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

नागरिकांनीही या काळात संयम व शिस्त पाळून दक्षता घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment